लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नामांकित कंपन्यांमध्ये भरतीच्या नावाखाली बेरोजगारांना जाळ्यात ओढून त्यांच्याकडून पैसे वसुलीचा नवीन धंदा नागपुरात सुरू आहे. पोलिसांनी अनेकांवर कारवाई केली असली तरीही दररोज नवीन कंपन्या भरतीची जाहिरात देऊन बेरोजगारांची लूट करीत आहे. या बनावट कंपन्यांच्या जाहिरातीसंदर्भात बेरोजगांनी दक्ष राहावे, असे आवाहन पोलीस विभागाने केले आहे.नागपूर आणि मुंबईत कार्यालय असल्याचे सांगून ए.एन. इंजिनिअरिंग या बनावट कंपनीने नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पात अटेंडंटस्च्या १५० जागा भरण्यात येत असल्याचा मॅसेज मोबाईल क्रमांक आणि नागपुरातील म्हाळगीनगर, हुडकेश्वर रिंगरोड अशा पत्त्यासह व्हॉटस्अॅपवर टाकला. हा मॅसेज व्हायरल झाला. तरुण-तरुणींनी या पत्त्यावर धाव घेतली तर काहींनी मेट्रो रेल्वेच्या कार्यालयात दूरध्वनी केला. अशी जाहिरात मेट्रो रेल्वे कार्यालयाने दिलेली नसल्याची माहिती पोलिसांना दिली. सदर प्रतिनिधीने कंपनीने जाहीर केलेल्या मोबाईल क्रमांकावर फोन केला असता, तो बंद होता. याशिवाय मंगळवारी पोलिसांनी चौकशी केली असता, नमूद पत्त्यावर कंपनीचे कार्यालय नव्हते. कंपनीच्या खोट्या जाहिरातीमुळे किती जणांची फसवणूक झाली, याची माहिती अजूनही पुढे आलेली नाही.मेट्रो रेल्वेमध्ये तिकीट काऊंटर आणि मेन्टेनन्स व हॅण्डलिंग या स्थायी पदासाठी १५० तरुण-तरुणींची भरती करण्यात येत असल्याचे मॅसेज सर्वत्र व्हायरल करण्यात आला. त्याकरिता १८ ते ३५ वयोगटातील १२ वी पास आणि पदवीधरांना (कॉम्प्युटर आॅपरेटर) संधी असल्याचे सांगण्यात आले. प्रशिक्षण कालावधीत तीन महिने १२,५०० रुपये आणि प्रशिक्षणानंतर २५ ते २७ हजार रुपये पगार आणि अर्ज करण्याची अखेरची तारीख २० नोव्हेंबर असल्याचे मॅसेजमध्ये नमूद करण्यात आले होते. याकरिता कंपनीच्या नागपुरातील म्हाळगीनगर चौक, हुडकेश्वर रिंगरोड येथील कार्यालयात अर्जासह संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले होते. भरतीसंदर्भात अनेकांमध्ये चर्चा सुरू झाली. पण मेट्रो रेल्वे कार्यालयाने वेळीच पावले उचलल्यामुळे बेरोजगारांची फसवणूक थांबली. आता बनावट कंपनीचे कार्यालयही नाही आणि मोबाईलही बंद आहे.भरतीसाठी मेट्रो कार्यालयच थेट जाहिरात काढतेमेट्रो रेल्वेत भरतीसाठी मेट्रो रेल्वेने कोणत्याही कंपनीची अधिकृत नियुक्ती केलेली नाही. बनावट कंपन्या खोट्या जाहिराती काढून बेरोजगारांची फसवणूक करीत आहेत. भरतीच्या मॅसेजची पोलिसांना माहिती दिल्यामुळे कंपनीचे संचालक फरार झाले आणि त्यांनी मोबाईल बंद केला. तरुणांनी खोट्या जाहिरातींना बळी पडू नये.अखिलेश हळवे, उपमहाव्यवस्थापक,महामेट्रो, नागपूर.
नागपूर मेट्रो रेल्वेमध्ये भरतीसाठी बनावट कंपनीची खोटी जाहिरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 1:15 AM
नामांकित कंपन्यांमध्ये भरतीच्या नावाखाली बेरोजगारांना जाळ्यात ओढून त्यांच्याकडून पैसे वसुलीचा नवीन धंदा नागपुरात सुरू आहे. पोलिसांनी अनेकांवर कारवाई केली असली तरीही दररोज नवीन कंपन्या भरतीची जाहिरात देऊन बेरोजगारांची लूट करीत आहे. या बनावट कंपन्यांच्या जाहिरातीसंदर्भात बेरोजगांनी दक्ष राहावे, असे आवाहन पोलीस विभागाने केले आहे.
ठळक मुद्दे बेरोजगारांना लुटण्याचा नवीन धंदा : कंपनीचे संचालक फरार