लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बनावट कागदपत्रांच्या आधारे बोगस अॅक्सिडेंटल क्लेम तयार करून खासगी कंपनीकडे रक्कम उकळू पाहणाऱ्या दोघांवर धंतोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. प्रीती वरुण जिभेकर आणि वरुण रमेश जांभेकर अशी आरोपींची नावे असून ते धरमपेठेतील आंबेडकर नगरात राहतात.
सदरमधील किंग्सवेवर एका खासगी इन्शुरन्स कंपनीचे कार्यालय आहे. या कंपनीतून काढलेल्या इन्शुरन्स पॉलिसीच्या दाव्यासंबंधीची बनावट कागदपत्रे प्रीती आणि वरुण जिभेकर या दोघांनी तयार केली. अॅक्सिडेन्टल ट्रिब्युनलमध्येसुद्धा हे बोगस क्लेम सबमिट केले. ज्या प्रकरणाचा हा दावा होता त्या प्रकरणात पूर्वीच धंतोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यावेळेची इन्शुरन्स पॉलिसी आरोपीकडे नव्हती. त्यामुळे त्यांनी बनावट कागदपत्रे तयार करून ती कागदपत्रे कंपनीत सादर केली. २ सप्टेंबर २०१४ ते २६ फेब्रुवारी २०२० दरम्यानची ही बनवाबनवी उघडकीस आल्यानंतर कंपनीचे व्यवस्थापक मुकेश ठाकरे (श्रीकृष्णनगर गोधनी) यांनी धंतोली ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यावरून पोलिसांनी प्रीती आणि वरुण जिभेकरविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.