नागपूर: उपराजधानीत ब्रँडच्या नावाखाली बनावट जोडे, कपडे, गॅजेट्सची विक्री होताना दिसून येते. पोलिसांनी शहरातील मुख्य बाजार असलेल्या इतवारीत ब्रँडच्या नावाखाली बनावट कपड्यांच्या विक्रीच्या रॅकेटमधील आरोपींवर कारवाई केली आहे. तहसील पोलिस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
‘पुमा’ नावाच्या कंपनीकडून जोड्यांशिवाय कपड्यांचीदेखील विक्री होते. नागपुरातील इतवारीत पुमाच्या नावाखाली बनावट कपड्यांची विक्री सुरू असल्याची माहिती कंपनीच्या स्वामित्व हक्कांचे संरक्षण अबाधित ठेवण्यासाठी जबाबदारी देण्यात आलेल्या फर्मचे फिल्ड ऑफिसर महेंद्र साहेन सिंग (३५, दिल्ली) यांना कळाली. ते इल्युडिक्सन ॲडव्होकेट अँड सॉलिसिटर फर्ममध्ये काम करतात.
त्यांनी परिमंडळ तीनच्या पोलिस उपायुक्त कार्यालयाला या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर तहसील पोलिसांच्या पथकासोबत गांजाखेत चौकातील बाजीराव गल्लीतील बीआरव्ही टॉवरमधील गुरू गोबिंदसिंग ट्रेडिंग या दुकानात धाड टाकली. तेथे तिसऱ्या माळ्यावर पुमा कंपनीच्या नावाने विकल्या जात असलेला बनावट माल आढळला. त्यात १७५ हाफपँट्स, १४० ट्रॅक पँट्स, २१५ टी शर्ट्स, २६ जॅकेट्स असा एकूण ४.२४ लाखांचा मुद्देमाल होता. दुकान मालक बंटी जेऊमल मनशानी (४१, जरीपटका) हा ५०० रुपये ते बाराशे रुपयांच्या दरम्यान या बनावट मालाची विक्री करत होता. पोलिसांनी संपूर्ण माल जप्त केला. बंटी मनशानीविरोधात तहसील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.