लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पोलिसांची कोठडी चुकविण्यासाठी कोरोनाबाधित असल्याचे बनावट प्रमाणपत्र पोलिसांकडे सादर करणारा कुख्यात बुकी सिराज रमजान शेख (वय ४८, रा. सोमवारी क्वार्टर) याला न्यायालयाने आज पुन्हा एक दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. दरम्यान, सिराजच्या काही साथीदारांची पोलीस चौकशी करीत आहेत.
नागपुरातील कुख्यात बुकी असलेला सिराज लॉटरी, ट्रॅव्हल्स आणि केबलचा व्यवसाय दाखवून आपल्या काळ्या धंद्यावर पडदा टाकण्याचे प्रयत्न करतो. चार आठवड्यांपूर्वी त्याच्या साथीदारांना क्रिकेट बेटिंग करताना पोलिसांनी पकडले तेव्हा सिराज फरार होता. त्याचा गुन्हेगारी अहवाल समोर येताच पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सिराजला शोधून अटक करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार प्रभारी पोलीस उपायुक्त सारंग आवाड यांनी ६ मे च्या रात्री आपल्या पथकामार्फत कुख्यात सिराजला पकडले. ठाण्यात पोहचण्यापूर्वीच सिराजने साथीदारांच्या माध्यमातून कोरोनाबाधित असल्याचे बनावट प्रमाणपत्र मिळवले. या प्रमाणपत्राच्या आधारे सिराजने पोलीस कोठडीतून सटकण्याचा डाव टाकला होता. मात्र, पोलीस आयुक्तांनी सिराजची टेस्ट करून घेतली. त्यात तो निगेटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलीस आयुक्तांनी सिराजविरुद्ध कोरोना संसर्गाच्या धोक्याचा आणि बनावट प्रमाणपत्र देऊन पोलिसांची दिशाभूल करण्याचे दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. त्याला त्यात अटक करून सिराजला कोरोनाचे बनावट प्रमाणपत्र मिळवून देणारे गजानन कोहाडकर तसेच जावेद यांनाही अटक केली. शनिवारी, रविवारी आणि सोमवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. तपासाची प्रगती दिसत असल्यामुळे तीन दिवसांपासूनन्यायालयाने आरोपींना एक दिवसाची पोलीस कोठडी वाढवून दिली आहे.
बबलूची शोधाशोध
कुख्यात सिराज शेखच्या बबलू नामक साथीदाराकडे मादक पदार्थ आणि अवैध धंद्याची माहिती असल्याचा संशय आहे. त्यामुळे पोलीस बबलूचा शोध घेत आहेत. सिराज तसेच बबलूची गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेऊन पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी या प्रकरणाच्या तपासावर नजर ठेवली आहे.