नागपूर : पुण्यात बोगस हेअर ट्रान्सप्लांट रॅकेटचा पोलिसांनी पदार्फाश केलाय. आरोपींनी तीन वर्षांच्या काळात तब्बल ३०० जणांची हेअर ट्रान्सप्लांट करून लाखो रुपयांची फसवणूक केल्याचे यातून पुढे आले. विशेष म्हणजे, एकाही आरोपीकडे भूल देण्याचे ज्ञान नव्हते. ‘बोगस हेअर ट्रान्सप्लांट’चा हा प्रकार नागपुरात धडाक्यात सुरू आहे. यामुळे अनेकांचे जीव धोक्यात येत आहे, ‘रिझल्टही’ही मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत.
टक्कल पडले की वय जास्त दिसते, आत्मविश्वास कमी होतो. आधीच्या काळात चाळिशीनंतर येणारे टक्कल आजच्या धकाधकीच्या स्पर्धात्मक जीवनात तणाव, भेसळयुक्त जेवण, प्रदूषण, बदलत चाललेली जीवनशैली या सर्वांमुळे विशीतच यायला लागले आहे. अकाली टक्कल पडल्यामुळे आजची युवा पिढी त्रस्त आहे. याचाच फायदा घेऊन नागपुरात बोगस ‘हेअर ट्रान्सप्लांट’चे रॅकेट धडाक्यात सुरू आहे. ट्रान्सप्लांटच्या नावाने सहायक (अटेन्डंट) भूल देण्यापासून ते हेअर ट्रान्सप्लांट करीत आहेत. यातून अनेकांच्या जिवाला धोका होत आहे. परंतु कोणी पोलिसांकडे तक्रार करीत नसल्याने ‘बोगस हेअर ट्रान्सप्लांट’ करणाऱ्यांचे चांगलेच फावत आहे.
हेअर ट्रान्सप्लांटनंतर पाच तरुणांचा मृत्यू
मागील पाच वर्षांत हेअर ट्रान्सप्लांट झालेल्या पटणा, अहमदाबाग, डेहराडून, मुंबई व चेन्नई येथील पाच तरुणांचा मृत्यू झाला. ट्रान्सप्लांटनंतर निर्माण झालेली गुंतागुंत व तज्ज्ञ नसलेल्या व्यक्तीने केलेल्या ट्रान्सप्लांटमुळे हा मृत्यू झाल्याचे पुढे आले आहे. यामुळे प्लास्टिक सर्जन व त्वचा रोग तज्ज्ञाकडून हेअर ट्रान्सप्लांट करण्याचे आवाहन विदर्भ हेअर रिस्टोरेशन असोसिएशनने केले आहे.
नागपुरात या भागात ‘बोगस हेअर ट्रान्सप्लांट’ जोरात
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, सक्करदरा, धंतोली, दिघोरी व देवनगर भागात ‘बोगस हेअर ट्रान्सप्लांट’चा व्यवसाय जोरात सुरू आहे. येथे स्वत:ला डॉक्टर सांगून अटेन्डंट ट्रान्सप्लांट करीत आहेत.
कोण डॉक्टर, कोण अटेन्डंट याची माहिती घ्या
विदर्भ हेअर रिस्टोरेशन असोसिएशनचे अध्यक्ष व प्लास्टिक सर्जन डॉ. सुरेश चवरे व असोसिएशनचे सचिव व त्वचारोग तज्ज्ञ डॉ. नितीन बरडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले, हेअर ट्रान्सप्लांट ही प्लास्टिक सर्जन किंवा त्वचारोग तज्ज्ञाकडूनच करणारी प्रक्रिया आहे. त्यांचे अनुभव व कौशल्यामुळे रुग्णाचा जीवाचा धोका कमी होतो, शिवाय त्याचे ‘रिझल्ट’ चांगले मिळतात. परंतु सध्या स्वत:ला डॉक्टर सांगून अटेन्डंट हेअर ट्रान्सप्लांट करीत आहेत. यामुळे अनेकांचा जीव धोक्यात येत आहे. शिवाय, योग्यप्रकारे ट्रान्सप्लांट होत नसल्याने त्याचा फायदा होत नसल्याच्या तक्रारी आहेत. यावर उपाय म्हणून ट्रान्सप्लांट करणारा डॉक्टर आहे किंवा नाही याची पडताळणी करून घ्या. तोच डॉक्टर पूर्णवेळ ट्रान्सप्लांट करणार का, याचीही माहिती घ्या, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
काय म्हणतात तज्ज्ञ
- कमी पैशात हेअर ट्रान्सप्लांट करण्याचे दावे करणाऱ्यांपासून सावध राहा.
- केसांचे प्रत्यारोपण हे फक्त आणि फक्त प्लास्टिक सर्जन किंवा त्वचारोगतज्ज्ञांकडून करून घ्या.
- प्रत्यारोपण ऑपरेशन थिएटरमध्येच करा.
- जिथे 'एक डॉक्टर एका दिवशी दोन किंवा अधिक पेशंटचे प्रत्यारोपण करतो,' तिथे नक्की समजावे, पात्रता नसलेले सहायक किंवा डॉक्टर्स हे काम करत असल्याचे समजावे.