लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोराडी रोडवरील आर्यनगरात मिरचीच्या गोदामाच्या आड बनावट दारू बनविण्याचा अड्डा जरीपटका पोलिसांनी उजेडात आणला आहे. या कारवाईत बनावट दारूच्या व्यवसायातील मुख्य सूत्रधाराचा कर्मचारी पोलिसांच्या तावडीत सापडला आहे.शिवराम बिहारीलाल यादव (२१) रा. टिगहरा, सिवनी असे अटक केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. पोलीस मुख्य सूत्रधार, त्याचे भागीदार आणि सहकाऱ्यांचा शोध घेत आहेत. शुक्रवारी रात्री उपनिरीक्षक व्ही. बी. फरताडे व पोलीस गस्त घालत होते. त्यांना नारा गावाकडे जाणाऱ्या मार्गावर लाल रंगाच्या दुचाकीवर पोते घेऊन जाताना एक युवक संशयास्पद अवस्थेत दिसला. त्याची दुचाकी थांबवून पोत्याची तपासणी केली असता त्यात दारूच्या रिकाम्या बाटल्यांसोबत इंग्रजी दारूच्या बॉटल्स आढळल्या. त्याला ताब्यात घेऊन साक्षीदारांसमोर चौकशी केली असता त्याने आपले नाव शिवराम यादव सांगितले. त्याने आहुजानगर येथील रहिवासी जयकुमार दर्यानी याच्याकडे काम करीत असल्याचे सांगितले. दर्यानी यांचे कोराडी मार्गावर आर्यनगरात गोदाम असून, तेथे मिरची गोदामाच्या मालकाच्या सांगण्यानुसार ब्रॅन्डेड इंग्रजी दारूच्या रिकाम्या बाटल्यात बनावट दारू भरून सील करण्यात येत असल्याचे त्याने सांगितले. जरीपटक्याचे ठाणेदार खुशाल तिजारे यांच्या निर्देशानुसार पोलिसांनी आर्यनगर येथील गोदामात धाड टाकली. तेथे विविध इंग्रजी दारूच्या रिकाम्या बॉटल्स, झाकण सील करण्याचे साहित्य आणि दारू तयार करण्याचे लिक्वीड आढळले. त्यासोबत दोन गॅस सिलिंडरसह ५८ हजार ६६० रुपयांचे साहित्य पोलिसांनी जप्त केले. आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारू प्रतिबंधक कायदा व इतर कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कोण आहे आरोपींच्या संपर्कात?पोलिसांना जरीपटका भागात काही व्यापारी बनावट दारू विक्रीच्या व्यवसायात सक्रिय असल्याची माहिती मिळाली आहे. आर्यनगरात मिरची गोदामाच्या आड बनावट ब्रॅन्डेड दारू विक्रीच्या सूत्रधारांचे जाळे कोणत्या डीलर, वाईन शॉपशी आहे याचा बारकाईने तपास केल्यास यातील व्यावसायिकांची माहिती मिळू शकते. त्यासाठी पोलीस संबंधितांच्या मोबाईल सीडीआरच्या तपासात लागले आहेत.मुख्य सूत्रधार, सहकारी नाही लागले हातीसूत्रांनुसार बनावट दारू विक्रीच्या व्यवसायात समोर आलेला सूत्रधार आजारी असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे त्याला अटक करण्यासाठी वेळ लागू शकतो. परंतु त्याच्या या व्यवसायात सहभागी इतर सहकाऱ्यांचा तपास लावण्याच्या कामात पोलीस लागले आहेत.
नागपुरात मिरची गोदामाच्या आड बनावट दारूचा व्यवसाय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2019 10:19 PM
कोराडी रोडवरील आर्यनगरात मिरचीच्या गोदामाच्या आड बनावट दारू बनविण्याचा अड्डा जरीपटका पोलिसांनी उजेडात आणला आहे. या कारवाईत बनावट दारूच्या व्यवसायातील मुख्य सूत्रधाराचा कर्मचारी पोलिसांच्या तावडीत सापडला आहे.
ठळक मुद्देमुख्य सूत्रधाराचा कर्मचारी पोलिसांच्या ताब्यात : दारू बनविण्याचे साहित्य जप्त