नागपूर : मोबाईल आणि इंटरनेटच्या वाढत्या उपयोगाच्या सोबतच आता सायबर क्राईमचे जाळेही पसरत आहे. त्यामुळे मोबाईल ओटीपी, लिंकच्या माध्यमातून अलिकडच्या काळात नागरिकांच्या बँक खात्यातून रक्कम उडविण्याचे प्रकार घडत आहेत. यातच काही दिवसांपासून भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) च्या नावाने मोबाईल धारकांना व्हॉट्सअॅपवर बनावट संदेश पाठविण्यात येत आहेत.
‘बीएसएनएल’च्या नावाने पाठविण्यात येणाऱ्या संदेशाच्या माध्यमातून नागरिकांना फसविण्यात येत आहे. या संदेशात ‘तुमचे बीएसएनएल सीम आज बंद होणार असून खाली दिलेल्या कस्टमर केअर सेंटरच्या क्रमांकावर २४ तासात संपर्क साधा’असे सांगण्यात येत आहे. ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने अशाच एका संदेशात दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला असता तो मोबाईल क्रमांक पश्चिम बंगालचा निघाला. हा मोबाईल व्यस्त असल्यामुळे बंगाली भाषेत संदेश येत होता. त्यानंतर ‘लोकमत’ प्रतिनिधीने ज्या मोबाईल क्रमांकावरून व्हाॅट्सअॅप संदेश आला होता त्यावर कॉल केला असता त्या मोबाईल क्रमांकावर ग्रामीण भागातील एका व्यक्तीशी संपर्क झाला. तो कुठुन बोलत आहे या बाबत विचारणा केली असता तो टाळाटाळ करीत होता. या घटनांवरून सीमकार्ड बंद होणार असल्याबाबतचा आलेला संदेश चुकीचा असल्याचे स्पष्ट झाले. याबाबत ‘बीएसएनएल’चे जनसंपर्क अधिकारी समीर खरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की ‘बीएसएनएल’च्या ग्राहकांना बनावट संदेश पाठविण्यात येत आहेत. ग्राहकांनी अशा संदेशापासून सतर्क राहण्याची गरज आहे. बीएसएनएलच्यावतीने असे कोणतेच संदेश पाठवित येत नाहीत. विभागाच्या वतीने हे संदेश पाठविणाऱ्यांचा शोध घेण्यात आहे.
................