नागपूर : बनावट नोटांची तस्करी करणाऱ्या आरोपीला नागपूर रेल्वेस्थानकात दुपारी १.३० वाजता रंगेहाथ अटक करण्यात आली. या घटनेबाबत ‘एटीएस’च्या पथकाने रविवारी दिवसभर लोहमार्ग पोलीस ठाण्यात कारवाई केली. परंतु प्रसारमाध्यमांना काहीही सांगण्यास टाळाटाळ केली.रेल्वेगाडी क्रमांक १८०३० हावडा-एलटीटी-कुर्ला एक्स्प्रेस दुपारी १.३० वाजता नागपूर रेल्वेस्थानकात आली. मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवादविरोधी पथकाचे निरीक्षक बी. डी. मिश्रा, उपनिरीक्षक रमेश बेव्हरीया, प्रशांत भोयर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह सापळा रचला होता. गाडी प्लॅटफार्मवर उभी राहताच या गाडीच्या जनरल कोचमधून आरोपी बनावट नोटा असलेली बॅग घेऊन खाली उतरला. ‘एटीएस’ पथकाने प्रसंगावधान राखून आरोपीला मुद्देमालासह रंगेहाथ अटक केली. त्यानंतर आरोपीस मुद्देमालासह लोहमार्ग पोलीस ठाण्यात आणण्यात आले.तेथे त्याच्या बॅगची तपासणी केली असता त्यात ९ लाख ११ हजारांच्या बनावट नोटा असल्याचे स्पष्ट झाले. दुपारी १.३० पासून सायंकाळी ७ वाजेपर्यंत ‘एटीएस’ पथकाची कारवाई सुरू होती. कारवाई झाल्यानंतर पथकाने आरोपीस गाडीत बसवून एटीएस कार्यालयात नेले. परंतु या पथकातील सदस्यांनी माध्यमांना काहीही माहिती देण्यास नकार दिला. रेल्वेस्थानकाप्रमाणेच दुसरीकडेही पथकाने सापळा रचल्याची माहिती असून आणखी काही गुन्हेगार एटीएस पथकाच्या हाती लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)
बनावट नोटांची तस्करी पकडली
By admin | Published: October 05, 2015 2:45 AM