सावनेर (नागपूर) : पोलिस असल्याची बतावणी करीत दाेघांनी एका कृषी विभागातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यास लुटले. आराेपींनी ६० हजार रुपये किमतीचे २४ ग्रॅम साेन्याचे दागिने घेऊन पाेबारा केला. ही घटना सावनेर शहरात खापा मार्गावरील दाट लाेकवस्तीच्या ठिकाणी मंगळवारी (दि. ७) सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली.
अशाेक गंभीर धरममाळी (६७, रा. गुऱ्हारीकर ले-आऊट, पंचशीलनगर, खापा राेड, सावनेर) हे कृषी विभाग काटाेल येथून निवृत्त झाले असून, मूळगावी सावनेर येथे वास्तव्यास आहेत. मंगळवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास ते माेपेड दुचाकीने (एमएच-४०/एएफ-३७३१) जात असताना एका अनाेळखी व्यक्तीने त्यांना आवाज दिला. त्यांनी दुचाकी घरी ठेवून ते त्या व्यक्तीकडे गेले. तिथे अंदाजे ४५ व ५० वर्षे वयाेगटातील दाेन अनाेळखी व्यक्ती उभे हाेते. त्यातील एकाने आपल्या गळ्यातील साेन्याची चेन दुसऱ्याला दिली. ती त्याने आपल्या बॅगमध्ये ठेवली. त्यानंतर एकाने मी पोलिस आहे, अशी बतावणी करून काल सावनेर चाैकात शिंदे मास्तरला चाकूने भाेसकून त्याच्या अंगावरील साेने चाेरून नेले, त्याची आम्ही चाैकशी करीत आहाेत. तुम्ही अंगावर एवढे साेने घालून कशाला फिरता, असे सांगून त्यांच्या अंगावरील साेन्याचे दागिने काढण्यास सांगितले. त्यानुसार धरममाळी यांनी हातातील १२ ग्रॅम साेन्याचे ब्रेसलेट, पाच ग्रॅम साेन्याची अंगठी व गळ्यातील साेन्याची चेन काढून आपल्या हातात घेतले. अशात आराेपींनी हातचलाखीने धरममाळी यांच्या खांद्यावरील रूमाल घेऊन त्यात सर्व दागिने ठेवले आणि कागदाची पुडी असलेला रूमाल देऊन त्यांना घरी जाण्यास सांगितले.
दरम्यान, ते घरी परत आल्यानंतर दागिने तपासण्यासाठी रूमाल उघडला असता, त्यात दागिन्यांऐवजी कागदाच्या बाेळ्यात दगड ठेवल्याचे दिसले. आपली फसगत झाल्याचे समजताच त्यांनी घराबाहेर येऊन रूपचंद अवझेकर यांना आपबीती सांगितली. मात्र ताेपर्यंत दाेन्ही ताेतया पोलिस पसार झाले हाेते. लगेच त्यांनी पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. याप्रकरणी सावनेर पाेलिसांनी अज्ञात आराेपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास ठाणेदार मारुती मुळूक करीत आहेत.