नागपूर : सेसची बनावट पावती तयार करून मार्केट यार्डातून मिरची बाहेर नेण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका मिरची व्यापाऱ्याचा ट्रक कळमना बाजार समितीच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी रात्री जप्त केला. व्यापाऱ्याचे नाव कळू शकले नाही.
कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक राजेश भुसारी म्हणाले, कृषी माल खरेदी केल्यानंतर समितीकडे सेसचा भरणा करून ट्रक वा मोठे वाहन कळमना परिसराबाहेर नेण्याचा नियम आहे. बुधवारी रात्री एक मिरची व्यापारी सेस प्रत्यक्ष न भरता सेस भरल्याची बनावट पावती तयार करून मिरचीचा ट्रक यार्डातून बाहेर नेत होता. समितीचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सेस पावतीची तपासणी केली असता, ती बनावट असल्याचे लक्षात आले. चौकशीनंतर सेस न भरताच ट्रकचालक मिरची यार्डाबाहेर नेत होता. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ट्रक जप्त करून समितीसमोरील जागेत उभा केला. ट्रकला जामर लावले आहे. त्यामुळे ट्रक सुरक्षित आहे.
भुसारी म्हणाले, गुरुवारी दुपारपर्यंत कुणीही व्यापारी मालावर हक्क सांगण्यास पुढे आला नाही. कृषी माल खरेदी केल्यानंतर खरेदीदाराला १०० रुपयांवर १.०५ रुपये सेस भरावा लागतो. जप्त ट्रकमधील मालाची किंमत काढून दंडस्वरूपात पाचपट सेस मालकाकडून वसूल करण्यात येणार आहे. मालक पुढे न आल्यास सोमवारी मालाचा लिलाव करण्यात येईल आणि त्यातून दंड स्वरूपातील सेसची रक्कम वजा करून मालकाला मालाची रक्कम दिली जाईल. यापूर्वीही अशा प्रकरणात बाजार समितीने कारवाई केली आहे.