नागपूर : भाजपने ईशान्येकडील तीन राज्यांत चांगली कामगिरी केली असली तरी महाराष्ट्रात पुण्यातील कसबापेठ येथील विधानसभेची जागा पक्षाला गमवावी लागली. या पराभवानंतर विविध चर्चांना उधाण आले असताना केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या नावाने सोशल माध्यमांवर तथ्यहीन पोस्ट ‘व्हायरल’ करण्यात येत आहे. यासंदर्भात गडकरींच्या कार्यालयाकडून नागपूर पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे.
विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या निकालानंतर भाजप नेत्यांच्या नावाने विविध पोस्ट फॉरवर्ड होण्यास सुरुवात झाली. त्यात प्रामुख्याने गडकरींच्या नावाखाली व्हॉट्सॲपवर दिशाभूल करणारी वक्तव्ये फॉरवर्ड केली जात आहेत. काही व्हॉट्सॲप ग्रुपवर देशमुख नावाच्या व्यक्तीने दिशाभूल करणारे व्हिडीओ पोस्ट केले. ही बाब गडकरी यांच्या कार्यालयाला समजली व त्याची खातरजमा करण्यात आली. त्यानंतर कार्यालयातर्फे नागपूर पोलिसांकडे यासंदर्भात तक्रार करण्यात आली आहे. गडकरींचे नाव वापरून अशा प्रकारे खोट्या व तथ्यहीन पोस्ट व बातम्या पसरविणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची विनंती नागपूर पोलिसांना करण्यात आली आहे. नितीन गडकरी यांच्या कार्यालयातून अशी तक्रार आल्याच्या माहितीला नागपूरच्या पोलिस आयुक्तांनी दुजोरा दिला आहे. सध्या ही तक्रार नागपूर पोलिसांच्या सायबर सेलकडे वर्ग करण्यात आली असून, चुकीचे व्हिडीओ पोस्ट करणाऱ्याचा शोध घेतला जात आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.