लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : इंटेलिजन्स सुरक्षा फोर्सच्या नावाने बनावट वेबसाईट तयार करून त्या माध्यमातून नोकरीच्या नावाखाली बेरोजगारांची फसवणूक करण्याचा डाव एका टोळीने रचला. वेळीच हा प्रकार उजेडात आल्याने शेकडो बेरोजगारांची फसवणूक करण्याचा संबंधित आरोपींचा डाव उधळला गेला. या खळबळजनक प्रकरणाची तक्रार मिळाल्यानंतर गिट्टीखदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला.९७६७१९७८९७ क्रमांकाच्या मोबाईलधारकाने महाराष्ट्र इंटेलिजन्स सुरक्षा फोर्स शिवरा, पिंपळगाव-निपानी (पिंपरी शहर) अमरावती (महाराष्ट्र) या नावाने ऑनलाईन बनावट बोर्ड तयार केला. डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू.एमआयएसएफ.इन नावाने बनावट वेबसाईट तयार केली. या वेबसाईटवर महाराष्ट राज्य सुरक्षा महामंडळात पदभरती करायची आहे, असे नमूद केले. वेबसाईट बघणाऱ्यांची खात्री पटावी म्हणून आरोपीने या वेबसाईटवर महाराष्ट राज्य सुरक्षा महामंडळाच्या तीन सह-संचालकांची नावे आणि पत्ताही नमूद केला. पदभरतीची ही जाहिरात ९७६७१९७८९७ क्रमांकाच्या मोबाईलधारकाने गुरुवारी ४ एप्रिलच्या मध्यरात्री १२ वाजता इंटरनेटवर अपलोड केली. शुक्रवारी ५ एप्रिलला ही बाब महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या नागपूर विभागाच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आली. त्यामुळे सहसंचालक जगदेव महादेव आकरे यांनी लगेच गिट्टीखदान पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी कलम ४१९ तसेच सहकलम ६६ (सी) अन्वये गुन्हा दाखल केला.मोठ्या टोळीचा संशयशेकडो बेरोजगारांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने एखाद्या सराईत सायबर गुन्हेगारांच्या टोळीने हे कटकारस्थान रचले असावे, असा कयास आहे. या प्रकरणाची पाळेमुळे शोधण्यासाठी सायबर शाखेची मदत घेतली जात असून, नमूद मोबाईल क्रमांकाच्या आधारे या प्रकरणाचा छडा लावण्याचा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
इंटेलिजन्स सुरक्षा फोर्सच्या नावाने बनावट वेबसाईट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2019 10:29 PM
इंटेलिजन्स सुरक्षा फोर्सच्या नावाने बनावट वेबसाईट तयार करून त्या माध्यमातून नोकरीच्या नावाखाली बेरोजगारांची फसवणूक करण्याचा डाव एका टोळीने रचला. वेळीच हा प्रकार उजेडात आल्याने शेकडो बेरोजगारांची फसवणूक करण्याचा संबंधित आरोपींचा डाव उधळला गेला. या खळबळजनक प्रकरणाची तक्रार मिळाल्यानंतर गिट्टीखदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
ठळक मुद्देबेरोजगारांच्या फसवणुकीचा कट : वेळीच उघड झाल्याने डाव उधळलागिट्टीखदानमध्ये गुन्हा दाखल