नागपूर: तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरू शकतो. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात घसरण होत आहे. काही दिवसांत सणांचा आणि त्यासोबतच लग्नसराईचाही हंगाम सुरू होणार आहे. सण आणि लग्नसराईच्या काळात सोन्याची मागणी वाढणार आहे. गुंतवणूकदारांसाठी हीच सुवर्णसंधी आहे. मंगळवारी २४ कॅरेट शुद्ध सोन्याचा दर ५९,२०० रुपये होता, हे विशेष.
वर्ष २०२३ची सुरुवात सोन्यासाठी खरोखरंच चांगली होती. मे महिन्यात मागणी वाढल्यानंतर दर ६२,२०० रुपयांच्या उच्चांकीवर पोहोचला होता. दर आणखी वाढण्याच्या शक्यतेने लोकांनी मोठ्या प्रमाणात सोने खरेदी केले. याच काळात जगभरातील केंद्रीय बँकांनी पूर्वीपेक्षा जास्त अर्थात ३८७ टन सोने खरेदी केले. जूननंतर स्थिती बदलली. सोन्याच्या खरेदीला उतरती कळा लागली. सोन्याच्या किमतीत टप्प्याटप्प्याने घसरण होऊ लागली.
...असे कमी झाले सोन्याचे दरनागपूर सराफा बाजारात जुलै महिन्यात १० ग्रॅम शुद्ध सोन्याचा दर ५८,५०० रुपयांपर्यंत कमी झाला होता. त्यानंतर दरवाढ होऊन ३१ जुलैला ६०,२०० रुपयांवर पोहोचला. ऑगस्ट महिन्यात दरात घसरण झाल्याचे दिसून आले. २९ ऑगस्टला दर ५९,२०० रुपयांवर स्थिर होता. १ ऑगस्टला ६० हजार, २ रोजी ५९,७०० रुपये, ८ ऑगस्टला ५९,६०० रुपये, १० रोजी ५९,२०० रुपये, १७ ऑगस्टला ५८,८०० रुपये, २८ रोजी दर ५९ हजार आणि २९ ऑगस्टला सोन्याचे दर ५९,२०० रुपयांवर पोहोचला. या दरावर ३ टक्के जीएसटी वेगळा आकारण्यात येत असल्याने प्रत्यक्ष दर ६१ हजार रुपयांवर गेला आहे. आगामी लग्नसराईच्या हंगामात सोन्याची मागणी वाढणार असून, दर ६५ हजार रुपयांवर जाण्याची शक्यता नागपूर सराफा असोसिएशनचे अध्यक्ष पुरुषोत्तम कावळे यांनी व्यक्त केली.