विवाहबाह्य संबंधाचा खोटा आरोप मानसिक क्रूरताच; पतीला मिळालेला घटस्फोट कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2022 10:41 AM2022-11-10T10:41:17+5:302022-11-10T10:46:35+5:30

उच्च न्यायालयाचे निरीक्षण

False accusation of extramarital affair on husband is mental cruelty; HC observation, divorce granted | विवाहबाह्य संबंधाचा खोटा आरोप मानसिक क्रूरताच; पतीला मिळालेला घटस्फोट कायम

विवाहबाह्य संबंधाचा खोटा आरोप मानसिक क्रूरताच; पतीला मिळालेला घटस्फोट कायम

googlenewsNext

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने घटस्फोटासंदर्भातील एका प्रकरणात अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय दिला. या प्रकरणातील पत्नीने स्वत:चा भोळेपणा सिद्ध करण्यासाठी पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा खोटा आरोप केला होता. न्यायालयाने पत्नीची ही कृती पतीकरिता मानसिक क्रूरता आहे, असे निरीक्षण नोंदवून पतीला कुटुंब न्यायालयामध्ये मिळालेला घटस्फोट कायम ठेवला.

न्यायमूर्तीद्वय अतुल चांदूरकर व उर्मिला जोशी यांनी हा निर्णय दिला. पती नागपूर तर पत्नी छत्तीसगड येथील रहिवासी आहे. त्यांचे २ जुलै १९९५ रोजी लग्न झाले होते. पत्नी सुरुवातीचे चार महिने चांगली राहिली. त्यानंतर ती पतीला मनस्ताप द्यायला लागली. ती घरातील दैनंदिन कामे करीत नव्हती. क्षुल्लक कारणांवरून भांडण करीत होती.

पतीला घाणेरडी शिवीगाळ करीत होती. वारंवार माहेरी जात होती. शरीरसंबंधास नकार देत होती. एक दिवस तिने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्नही केला होता. पतीविरुद्ध पोलीस ठाण्यात छळ, मारहाण इत्यादी गंभीर आरोप करणाऱ्या तक्रारी केल्या होत्या. दरम्यान, ती पतीच्या परवानगीशिवाय कायमची माहेरी निघून गेली. पतीने प्रयत्न करूनही ती सासरी परत आली नाही. त्यावेळी पत्नीच्या भावांनी पतीला जबर मारहाण केली. न्यायालयाने हा निर्णय देताना पत्नीची ही एकूणच वागणूकसुद्धा विचारात घेतली.

पतीच्या मृत्यूनंतरही अपील दखलपात्र

नागपूर कुटुंब न्यायालयाने १९ जून २००६ रोजी पत्नीची क्रूरता व विभक्ततेच्या आधारावर पतीला घटस्फोट मंजूर केला. त्याविरुद्ध पत्नीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. ते अपील प्रलंबित असताना पतीचा मृत्यू झाला. त्यामुळे अपिलावर सुनावणी केली जाऊ शकत नाही, असा दावा पतीच्या वकिलाने केला होता. उच्च न्यायालयाने तो दावा खारीज केला. घटस्फोटामुळे सामाजिक बदनामी होते. मालमत्तेचे अधिकार बाधित होतात. परिणामी, हे अपील दखलपात्र आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

Web Title: False accusation of extramarital affair on husband is mental cruelty; HC observation, divorce granted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.