लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाग्रस्त रुग्णांबाबत खोटी ऑडिओ क्लिप व्हायरल करून दहशत पसरविणाऱ्या तीन आरोपींना न्यायालयाने ३० मार्चपर्यंत पोलीस कोठडीत पाठवले आहे.या तीन आरोपींमध्ये जय ओमप्रकाश गुप्ता (३७) रा. कामठी, अमित शिवपाल पारधी (३८) रा. जरीपटका आणि दिव्यांश रामविलास मिश्रा (३३) रा. अजनी यांचा समावेश आहे. तिन्ही आरोपी उच्चशिक्षित आहेत. त्यांनी गेल्या २३ मार्च रोजी नागपुरात २०० पेक्षा अधिक रुग्ण असून ५९ रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचा दावा करणारी ऑडिओ क्लिप तयार केली होती. यात डॉ. कमलेश व्हेंटिलेटरवर असल्याचा उल्लेख केला होता. तसेच नागपुरात प्रशिक्षित प्रयोगशाळा कर्मचारी नसल्याचा दावाही केला होता. ही क्लिप व्हायरल होताच लोकांमध्ये दहशत पसरली होती. बुधवारी २५ मार्च रोजी नागरिकांच्या माध्यमातून ही क्लिपिंग पोलिसांपर्यंत पोहोचली. याची चौकशी केली असता सायबर सेलला आरोपींवर संशय आला. त्यांची विचारपूस केली असता त्यांनी कबुली दिली. पोलिसांनी आरोपींना शुक्रवारी अटक केली. सदर पोलीस ठाण्यात भादंवि कलम १८८, ५०५ व आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम ५४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. शनिवारी सदरचे पोलीस निरीक्षक ठाणेदार महेश बन्सोडे यांनी आरोपींना न्यायालयासमोर सादर केले. न्यायालयाने आरोपींना ३० मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
खोटी ऑडिओ क्लिप व्हायरल करणाऱ्यांना ३० पर्यंत पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 11:57 PM