लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आपल्या देशाचा इतिहास हा गौरवशाली राहिला आहे. मात्र ७०० वर्षांपूर्वी झालेल्या परदेशी आक्रमणानंतरचा इतिहासच समोर आणला गेला. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील अनेक योद्ध्यांचे योगदान दाबण्याचा जाणिवपूर्वक प्रयत्न झाला. खऱ्या अर्थाने देशाच्या राजकारण्यांमुळेच अंतर्गत सुरक्षेवर आव्हान उभे ठाकले आहे, असा दावा ज्येष्ठ पत्रकार व विश्लेषक पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांनी केला. ‘मंथन’तर्फे आयोजित देशाची अंतर्गत सुरक्षा व आव्हान या विषयावर ते बोलत होते.चिटणवीस केंद्रात रविवारी सायंकाळी हा कार्यक्रम पार पडला. देशाच्या स्वातंत्र्यानंतर जाणूनबुजून काही विशिष्ट लोकांसाठी फायद्याचा ठरणारा इतिहास समोर आणण्यात आला तर सत्य दाबण्यात आले. अगदी महात्मा गांधींच्या हत्या संदर्भातील कपूर आयोगाचा अहवालदेखील समोर आला नाही. देशहिताच्या मुद्यांकडे डोळेझाक करुन ‘व्होटबँक’ वाढविण्यावर भर देण्यात आला, असा आरोप यावेळी कुलश्रेष्ठ यांनी केला.आजच्या तारखेत देशासमोर पाकिस्तान किंवा चीनपेक्षा जास्त धोका हा अंतर्गत फुटिरवाद्यांचा आहे. आपल्याच देशात राहून हे लोक देशविरोधी गोष्टी बोलत आहेत, कारवायांना प्रोत्साहन देत आहेत. आज लढाई ही शस्त्रांनी किंवा युद्ध मैदानावर नव्हे कर वैचारिक पातळीवर लढली जात आहे. त्यासाठीच तथ्यहीन गोष्टी इतिहासाच्या नावाखाली पसरविल्या जात आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे यात राजकारणी आघाडीवर आहेत, असे ते म्हणाले.आपल्या देशाची शोकांतिका म्हणजे सुभाषचंद्र बोस यांना युद्ध गुन्हेगार ठरविण्यात आले व भगतसिंह, सावरकर यांच्या त्यागावर प्रश्नचिन्ह लागले. अनेक खरे ‘हिरो’ देशासमोर आलेच नाही, असेदेखील त्यांनी प्रतिपादन केले. अंकिता देशकर यांनी कार्यक्रमाचे संचालन केले.नथुराम गोडसे हिंदू दहशतवादी कसा ?दहशतवादाला कुठलाही धर्म नसतो. मात्र तरीदेखील हिंदू दहशतवादावर चर्चा होते. मात्र इस्लाम दहशतवादावर कुणीच बोलत नाही. नथुराम गोडसे पहिला हिंदू दहशतवादी होता असे दावे करण्यात येत आहेत. गोडसेने महात्मा गांधी यांना मारून घोर पापच केले होते. त्याचे समर्थन होऊच शकत नाही. मात्र गोडसेने धर्मांधतेतून महात्मा गांधी यांच्यावर गोळ्या झाडल्या नव्हत्या. त्याने गांधींना का मारले या कारणांची चर्चा होत नाही. जर धर्माच्या आधारावर गोडसेने गांधींना मारले नव्हते तर मग तो हिंदू दहशतवादी कसा होता, असा प्रश्न कुलश्रेष्ठ यांनी उपस्थित केला.
देशावर खोटा इतिहास लादला गेला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 12:12 PM
आपल्या देशाचा इतिहास हा गौरवशाली राहिला आहे. मात्र ७०० वर्षांपूर्वी झालेल्या परदेशी आक्रमणानंतरचा इतिहासच समोर आणला गेला.
ठळक मुद्देदेशाच्या अंतर्गत सुरक्षा व आव्हानांवर ‘मंथन’