लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : विधानसभेच्या डायरीत नाव नोंदविण्यासाठी खोटी माहिती देणारी तथाकथित महिला पत्रकार आणि तिच्या साथीदाराविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सरिता कुलकर्णी व नरेंद्र वैरागडे अशी आरोपींची नावे आहेत. हिवाळी अधिवेशनात माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडून विधिमंडळातील दूरध्वनी व व्यवस्थेसंदर्भातील डायरी प्रकाशित केली जाते. यात नेते, अधिकाऱ्यांसोबत प्रमुख वर्तमानपत्रे व वृत्तवाहिन्यांच्या पत्रकारांसह सर्वांची नावे, पदे आणि क्रमांक नोंदविलेली असतात. सरिता कुलकर्णी यांनी स्वत:ला नेटवर्क-१० चे ब्यूरो चीफ आणि नरेंद्र वैरागडे त्यांचे सहकारी असल्याचे सांगून, डायरीत नाव नोंदविण्यासाठी माहिती विभागाकडे अर्ज केला. त्याआधारे माहिती विभागातर्फे नेटवर्क-१० चे राज्य प्रमुख विनोदकुमार ओझा यांच्याशी संपर्क साधण्यात आला. तसेच कुलकर्णी यांनी सादर केलेले नियुक्तिपत्र त्यांना पाठविले. ओझा यांनी अशा कोणत्याही व्यक्तीची नियुक्ती केल्याचा इन्कार केला. नियुक्तिपत्रावर ओझा यांची बनावट स्वाक्षरी होती. ओझा यांनीही आपली स्वाक्षरी नाकारली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ओझा यांनी पुण्यातील येरवडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तपास सदर पोलिस ठाण्यात वर्ग केला आहे. सदर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
- विधिमंडळ परिसरात ‘तथाकथित’ पत्रकारांचा सुळसुळाट
विधिमंडळ परिसरात यंदा तथाकथित पत्रकारांचा सुळसुळाट झाला आहे. वर्षभर पत्रकारितेत कुठेही न दिसणारे, मात्र अधिवेशन काळात अचानक उगवणारे अनेक पत्रकार तयार झाले आहेत. अगदी बोटांवर व्ह्यू असलेल्या कोणत्या तरी स्थानिक यू-ट्यूब चॅनेल किंवा फेसबुक चॅनेलच्या नावावर हे पत्रकार विधिमंडळ सचिवालयाकडे प्रवेशपत्राची मागणी करतात. सचिवालयाकडूनदेखील कोणत्याही पद्धतीची खातरजमा न करता प्रवेशपत्र जारी करण्यात येतात. परिसरात अशी पत्रकारांची संख्या खूप वाढली आहे. एखाद्या नेत्याला अचानक थांबवायचे व मनाला वाटेल तसे ‘अर्थपूर्ण’ प्रश्न विचारण्यावरच त्यांचा भर असतो. असे करत असताना नियमांचेदेखील पालन होत नाही. यामुळे विधिमंडळ परिसरात सुरक्षारक्षकांचीदेखील डोकेदुखी वाढली आहे.
- गंभीरपणे वार्तांकन करणाऱ्यांना मनस्ताप
विधिमंडळात जनतेच्या हिताच्या मुद्द्यांचे वार्तांकन करण्यासाठी पत्रकार जात असतात. मात्र, सभागृहात हे तथाकथित पत्रकार फिरकतदेखील नाही. त्यांचे पूर्ण लक्ष परिसरातील नेते, त्यांचे सचिव यांच्यावरच असते. अशा तथाकथित पत्रकारांमुळे खरोखरच गंभीरपणे वार्तांकन करायला येणाऱ्या इतर ‘डिजिटल’ पत्रकारांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. काही जणांनी तर चक्क कुटुंबातील सदस्यांनाच कॅमेरामन किंवा सहकारी असल्याचे दाखवत आणल्याचे चित्र आहे. जर अधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला तर एखाद्या मोठ्या नेत्याचे नाव सांगत ‘त्यांच्याशी बोलावे लागेल’ अशी धमकीच देण्यात येते.