नागपूर : बोगस बिल तयार करून खोट्या इनपुट टॅक्स क्रेडिटची उचल करणारे उद्योजक आणि व्यावसायिकांविरुद्ध सुरू असलेल्या मोहिमेंतर्गत केंद्रीय जीएसटी गुप्तचर संचालनालयाच्या (डीजीजीआय) औरंगाबाद क्षेत्रीय युनिटने एमएस वेस्ट/स्क्रॅपचा व्यवसाय करणाऱ्या एका फर्मच्या दोन संचालकावर धाड टाकून अटक केली.
दोन्ही संचालकाने फर्मच्या माध्यमातून बोगस पावत्याद्वारे १७०.३५ कोटींचा व्यवहार करून ३२.७६ कोटींचा इनपुट टॅक्स क्रेडिटचा फायदा घेतला. दोन्ही संचालकानी कोणत्याही वस्तूंचा पुरवठा न करता बोगस बिलाच्या आधारावर खोटे आयकर विवरण दाखल केले आहे. यासंदर्भात डीजीजीआयच्या औरंगाबाद क्षेत्रीय युनिटने ३ आणि ४ डिसेंबरला विविध ठिकाणी धाडी टाकल्या. या कारवाईत व्यवहाराच्या विविध नोंदी असलेली डायरी आणि शीट ताब्यात घेतल्या. खोटा व्यवहार करून ५ टक्के जीएसटी रेट अर्थात दोन्ही बाजूने २.५ टक्के कमिशन घेतल्याचे चौकशीदरम्यान आढळून आले. अशा प्रकारे या दोन्ही करदात्यांनी हजारो व्यवहार केले आहेत. चौकशीदरम्यान करदात्यांनी खोटे व्यवहार केल्याचे कबूल केले. कमिशन रकमेच्या बँक पेमेंटच्या आधारावर खोट्या व्यवहाराचा शोध घेण्यात येत आहे. करदात्यांनी बोगस पावत्यांच्या आधारे १८.६६ कोटी आणि १४.१० कोटींचे इनपुट टॅक्स क्रेडिट घेतल्याचे चौकशीत आढळून आले. यानुसार करदात्याने सीजीएसटी कायदा २०१७ चे उल्लंघन केले आहे.
दोन्ही संचालकाला ४ डिसेंबरला अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायाधीशांनी दोघांनाही १९ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.