लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गटार लाइन फुटल्याने घरात घाण पाणी साचत असल्याची तक्रार करूनही मनपाचे अधिकारी याची दखल घेत नाहीत. यामुळे धंतोली झोनअंतर्गत प्रभाग ३३ मधील कौशल्यायननगरात गल्ली क्रमांक १५ येथील विशाखा रामटेके यांच्या कुटुंबीयांना मागील दहा महिन्यांपासून घाण पाण्याचा त्रास सोसावा लागत आहे. त्यांच्यासोबतच परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
गटर लाइन फुटल्याने आरोग्य धोक्यात आल्याबाबत धंतोली झोनच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केली; परंतु अधिकारी याची दखल घेत नाही. रामटेके यांच्या शेजाऱ्याने गटार लाइनवर अतिक्रमण केले आहे. यामुळे गटार लाइन फुटली आहे. घाण पाणी विशाखा रामटेके यांच्या घरात स्वयंपाक खोलीपर्यंत येत आहे.
३ फेब्रुवारीला रामटेके यांनी धंतोली झोनमध्ये लेखी तक्रार केली; परंतु अद्याप धंतोली झोन अधिकाऱ्यांनी दखल न घेतल्याने त्यांनी आयुक्त, महापौरांनाही तक्रार दिली. महापौरांनी धंतोली झोनचे कार्यकारी अभियंता व कनिष्ठ अभियंता यांना कार्यवाहीचे निर्देश दिले. मात्र, याचा उपयोग झाला नाही. अतिक्रमण करणाऱ्याला नोटीस बजावली असल्याचे सांगून अधिकारी आपली जबाबदारी झटकत आहेत.