कुही : कोरोनाने अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाले. कित्येकांच्या जगण्याचा आधार हिरावला गेला. अनेक कर्ते पुरुष गेल्याने महिलांवर लहान वयातच वैधत्व आले. मुले पोरकी झाली. असाच प्रकार कुही शहरात हातमजुरी करणाऱ्या काळे कुटुंबीयांवर आला. कुही येथील कवडू काळे (३२) मोलमजुरी करून कुटुंबाचे पालन-पोषण करायचा. मात्र, कोरोनाबाधित झाल्यानंतर त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याच्यापश्चात म्हातारे आई-वडील, २५ वर्षीय पत्नी, तीन वर्षांची मुलगी संस्कृती आणि लहान भाऊ आहे. घरातील कर्ता पुरुष गेल्याने काळे कुटुंबावर आभाळ कोसळले. पत्नीवर अभागी जीवन जगण्याची वेळ आली. अशात मुलांचे पालन पोषण कसे करायचा अशा प्रश्न तिच्यापुढे निर्माण झाला आहे. तेव्हा शासन आणि सामाजिक संस्थांनी अशा कुटूंबियांचे पालकत्व स्वीकारावे व त्यांना उदरनिर्वाह करीता रोजगार उपलब्ध करून द्यावा,अशी मागणी तालुका पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आली आहे. याची दखल घेत, मातोश्री प्रभादेवी या सामाजिक संस्थेचे संचालक प्रमोद घरडे यांनी कवडू काळे यांच्या विधवा पत्नीला आर्थिक मदत, धान्य व वस्त्र आदी वस्तू सोपविल्या. यासोबतच भविष्यातही मदत करण्याची ग्वाही दिली. याप्रसंगी नागपूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रदीप घुमडवार, तालुका पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष सज्जन पाटील, पत्रकार सुनील गांगलवार, उल्हास मेश्राम, निखिल खराबे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
त्या कुटुंबीला मिळाला सामाजिक आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2021 4:08 AM