नागपूर : रात्री बिर्याणी घेऊन घरी परतणाऱ्या एका मुलासह त्याच्या कुटुंबीयांना वस्तीतीलच एका परिवाराने मारहाण केल्याची घटना घडली. दोन्ही कुटुंबांमध्ये जोरदार वादावादी झाली व त्याचे पर्यवसान मारहाण व जीवे मारण्याच्या धमकीत झाले. यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
तक्रारदार शबाना शबील शेख या समता गार्डनजवळ राहतात. मंगळवारी रात्री त्यांचा मुलगा राहील (१८) हा बिर्याणी आणण्यासाठी दुचाकीवर गेला होता. त्यांच्या तक्रारीनुसार, तो रात्री साडेदहाच्या सुमारास घराजवळ पोहोचला असता वस्तीतच राहणाऱ्या शेषराव राऊतने त्याला गाडी हळू चालव असे म्हणत टोकले. मुलाने ठीक आहे असे म्हटल्यावरदेखील राऊतने त्याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. राऊतचा मुलगा शुभमने शबाना यांना धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली व त्यांचा मधला मुलगा तौशिभला मारहाण सुरू केली. तर शेषरावचा जावई प्रवीण याने शबाना यांचा मोठा मुलगा तनवीरच्या डोक्यावर लाठीने प्रहार केला. शुभम त्यानंतर घरात गेला व चाकू घेऊन त्याने तनवीरवर वार करण्याचा प्रयत्न केला. शबाना यांनी चाकू हाताने पकडला. राऊत व त्याच्या कुटुंबीयांनी शबाना यांच्या गाडीची तोडफोड केली तसेच सर्वांना जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकारानंतर शबाना पती व मुलांसह यशोधरानगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवायला पोहोचल्या. पोलिसांनी या प्रकरणात शेषराव, शुभम राऊतसह त्याची मुलगी प्रिया व जावई प्रवीणविरोधात गुन्हा नोंदविला आहे.
दरम्यान, शुभम राऊत यानेदेखील शबाना व तिच्या तीनही मुलांविरोधात तक्रार नोंदविली आहे. राहीलने शेषराव राऊत व जावयावर दारू प्यायल्याचा आरोप लावला. शिवाय त्यानंतर तीनही मुले दोघांनाही शिवीगाळ करत होती. एका मुलाने सोनपापडी कापण्याच्या चाकूने वार करत मला व माझ्या बहिणीला जखमी केले. तसेच जावई व वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली, असा दावा शुभमने तक्रारीत केला आहे. पोलिसांनी या तक्रारीवरून शबाना व तिच्या तीनही मुलांविरोधात गुन्हा नोंदविला आहे.