लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने सोमवारी दुपारी वाठोड्यात सुरू असलेल्या एका कुंटनखान्यावर छापा घातला. येथे वेश्या व्यवसाय करणाऱ्या एका महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले. तर तिच्याकडून वेश्या व्यवसाय करवून घेणाऱ्या दाम्पत्यासह त्यांच्या मुलालाही पोलिसांनी अटक केली.
सुशीला ऊर्फ शांता (वय ५९), तिचा पती लहू गेडाम (वय ६०) आणि मुलगा राजेंद्र लहू गेडाम (वय ३४) अशी आरोपींची नावे आहेत.
वाठोडा पोलीस ठाण्याच्या मागे विठोबा नगर आहे. येथे आरोपी गेडाम दाम्पत्याचे दुमजली घर आहे. आरोपी गेडामकडे अनेक रिक्षा आहेत. ते भाड्याने देऊन रोज हजारो रुपये कमविणाऱ्या गेडाम दाम्पत्याने मुलाच्या मदतीने घरातच कुंटनखाना सुरू केला होता. त्याची कुणकुण लागताच गुन्हे शाखेच्या पथकाने गेडाम दाम्पत्याकडे नजर रोखली. सोमवारी दुपारी त्यांच्याकडे पोलिसांनी पंटर पाठविला. त्याने वारांगणेची मागणी केली. विशिष्ट रक्कम मागून त्यांनी पंटरला वेश्या व्यवसाय करणारी एक महिला उपलब्ध करून दिली. पंटरने तिला गेडामच्या घरातील एका रूममध्ये नेले. ठरल्याप्रमाणे काही वेळेतच गुन्हे शाखेचे पोलीस तेथे धडकले. त्यांनी त्या वारांगणेला ताब्यात घेतले. तिने गेडाम दाम्पत्याने पैसे देऊन वेश्या व्यवसाय करण्यास बाध्य केल्याचे सांगितल्याने पोलिसांनी सुशीला, लहू आणि त्यांचा मुलगा राजेंद्र गेडाम या तिघांना अटक केली. गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त सुनील फुलारी, उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली एसएसबीचे पोलीस निरीक्षक सार्थक नेहते, उपनिरीक्षक स्मिता सोनवणे, मंगला हरडे, अनिल अंबादे, राशिद शेख, भूषण झाडे, अजय पाैनिकर, सुजाता पाटील आणि ज्योती आगासे यांनी ही कारवाई केली.
सुशीला सराईतच
हा कुंटनखाना चालविणारी सुशीला गेडाम कुख्यातच आहे. तिच्यावर अशा प्रकारे यापूर्वी सक्करदरा आणि नंदनवन पोलीस ठाण्यातही गुन्हे दाखल आहेत. तिच्याकडे वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांची आणि ग्राहकांची भली मोठी यादी आहे.