नागपूर - परका प्रांत अन् अनोळखी माणसं. गर्दीच्या ठिकाणी वाहनांच्या गोंगाटात आईवडील दिसत नसल्याने एक चिमुकला कावराबावरा झाला होता. त्याला व्यवस्थित बोलताही येत नव्हते म्हणून जीवाच्या आकांताने तो रडत होता. दोन सदगृहस्थांनी त्याची साद ऐकली अन् काही वेळेनंतर तो सुखरूप त्याच्या आईच्या कुशित पोहचला. पदड्यावरची वाटावी अशी ही घटना सोमवारी रात्री सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.
गाैरव प्रेमलाल शर्मा हा चार वर्षांचा बालक खरगोन (मध्यप्रदेश) जिल्ह्यातील पुडगाव, भिकनगाव येथील रहिवासी. त्याची आई संगीता प्रेमलाल शर्मा त्याला सोमवारी नागपुरात घेऊन आली. गड्डीगोदाममधील गाैतम नगरात तिचे नातेवाईक राहतात. नातेवाईकांच्या गप्पागोष्टीत रंगल्याने संगीताचे काहीसे दुर्लक्ष झाले. तिकडे चिमुकला गाैरव चालत चालत रस्त्यावर आला. गर्दी आणि वाहनाचा गोंगाट त्याला गोंधळून टाकणारा ठरला. सर्वच अनोळखी दिसत असल्याने तो कावराबावरा झाला. मोठमोठ्याने रडू लागला. या भागातील दोन सदगृहस्थानी गाैरवला जवळ घेतले. त्याला नाव पत्ता विचारला. त्याला व्यवस्थित काही सांगता येत नव्हते. त्यामुळे त्या सदगृहस्थानी त्याला सदर पोलीस ठाण्यात आणले. ठाणेदार विनोद चाैधरी यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने अनोळखी चिमुकला गड्डीगोदाम भागात सापडल्याची माहिती वायरलेसवर दिली. तिकडे सहायक पोलीस निरीक्षक भारती गुरनुले, हवलदार जमील शेख, नायक प्रमोद दिघोरे, नरेंद्र जयसिंगपुरे यांनी शोधाशोध करून चिमुकल्या गाैरवची आई शोधून काढली. रात्री उशिरा तिला तिच्या लाडक्याला सोपविण्यात आले. सैरभैर झालेले मायलेक भेटले अन् जिवघेण्या शंका कुशंकांना विराम मिळाला.
पोलीस देवदूत ठरले
दुरावलेल्या चिमुकल्याला त्याच्या आईच्या कुशीत पोहचिवणारे ते दोन देवदूत कोण, हे स्पष्ट झाले नाही. मात्र, संगीता शर्मा आणि तिचा चिमुकला गाैरव या मायलेकांसाठी पोलीसच देवदूत ठरले. त्यांना लाख दुवा देत संगीता आपल्या नातेवाईकांसह घरी निघून गेली.
----