लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी महानायक अमिताभ बच्चन नागपुरात आल्यानंतर त्यांना प्रत्यक्ष पाहण्याची आबालवृद्धांमध्ये आतुरता आहे. मंगळवारी ‘बिग बी’ मोहननगर येथील शाळेत बनविण्यात आलेल्या चित्रीकरणाच्या ‘सेट’वर पोहोचले. तेथे त्यांना पाहण्याची संधी मिळेल, अशी त्यांच्या चाहत्यांना अपेक्षा होती. मात्र कडेकोट सुरक्षाव्यवस्थेमुळे बच्चन यांचे नखदेखील पाहायला मिळाले नाही. केवळ ‘एक झलक’ दाखविली तरी आमच्यासाठी तो समाधानाचा क्षण असेल, अशी भावना नागपूरकरांनी बोलून दाखविली. नागराज मंजुळे दिग्दर्शित करीत असलेल्या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी अमिताभ बच्चन सोमवारीच नागपुरात पोहोचले. मात्र सोमवारी ते हॉटेलबाहेर निघालेच नाही. मंगळवारी ते मोहननगर येथील शाळेत बनविण्यात आलेल्या ‘सेट’वर येतील, या अपेक्षेने मोठ्या प्रमाणावर चाहते उपस्थित होते. शाळा ३ वाजता सुटल्यानंतर विद्यार्थी, पालक यांचीदेखील गर्दी वाढली. अखेर दुपारी ३.३० वाजता ‘बिग बी’ तेथे पोहोचले. एकाच वेळी पाच कार आल्याने ‘बिग बी’ नेमके कुठल्या कारमध्ये आहे, हे पाहण्यासाठी धावपळ सुरू झाली. तिसऱ्या क्रमांकाच्या कारमध्ये ते असल्याचे लक्षात येताच, नागरिकांनी अक्षरश: कारला घेरले व काचेमधून बच्चन यांना पाहण्याचा प्रयत्न करू लागले. मात्र सुरक्षारक्षकांनी नागरिकांना लगेच दूर केले. त्यानंतर कार थेट आतच गेली. त्यामुळे अनेक तासांपासून उभ्या असलेल्या चाहत्यांना बच्चन यांचा चेहरादेखील पाहता आला नाही.महिला, विद्यार्थ्यांची नाराजी बच्चन यांना पाहण्यासाठी शाळेसमोर महिला तसेच विद्यार्थीदेखील उपस्थित होते. मात्र त्यांचे दर्शनच न झाल्याने लहान मुले नाराज झाली. अमिताभ बच्चन यांनी कमीतकमी चेहरा दाखविला असता तर सर्वांना आनंद झाला असता, अशी भावना महिलांनी व्यक्त केली. बच्चन म्हणाले, नागपूरची भरभराट होवोदरम्यान, अमिताभ बच्चन यांनी सोमवारी रात्री ११ वाजता ‘टिष्ट्वटर’वर नागपुरात आल्याची छायाचित्रे ‘शेअर’ केली. चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी नागपूरला आलो आहे. मराठी ब्लॉकबस्टर ‘सैराट’चे दिग्दर्शक नागराज यांचा पहिला हिंदी सिनेमा...आकर्षणाचे केंद्र आणि नागपूर भौगोलिकदृष्ट्या भारताचे केंद्र. दोघांचीही भरभराट होवो, असे त्यांनी ‘टिष्ट्वट’मध्ये लिहिले.दिग्दर्शकाचे चाहत्यांना आवाहनदरम्यान, नागराज मंजुळे यांनी आपल्याला शांततेच चित्रपटाचे चित्रीकरण करू द्या, असे आवाहन चाहत्यांना केले आहे. जर अशाप्रकारे गर्दी वाढत राहिली तर अनेक अडचणी येऊ शकतात आणि शांततेत बच्चन यांना काम करता येणार नाही, असे मंजुळे यांनी म्हटले आहे. खासगी विमानाने परतणार अमिताभअमिताभ बच्चन सोमवारी सकाळी १३ सीटर ‘ई-१३५’ विमानाने नागपुरात पोहोचले होते. हे विमान मुंबईला परत रवाना झाले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमिताभ नागपुरात चित्रीकरणासाठी तीन दिवस थांबतील. त्यानंतर परत खासगी विमानाने ते मुंबईला परतणार आहेत. त्यांचे विमान सोमवारी ५० मिनिटे नागपुरात होते. विमातळावर ‘लँडिंग’ व ‘पार्किंग’साठी जवळपास चार हजार रुपयांचे शुल्क घेण्यात आले.हॉटेलमध्ये केले ‘वर्कआऊट’ अमिताभ बच्चन वर्धा मार्गावरील एका हॉटेलमध्ये थांबले आहेत. त्यांच्या वेळापत्रकाबाबत काहीही सांगण्यास हॉटेलमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी नकार दिला. सर्वांनीच मौन साधले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी बच्चन यांची दैनंदिनी दररोजप्रमाणेच होती. सकाळी हॉटेलमध्ये त्यांनी ‘वर्कआऊट’ केले आणि शाकाहारी जेवण केले.