नागपूर : विघातक परंपरेला आणि विनाशक कृतींना नाकारून भगवान गौतम बुद्धाच्या शांतीच्या मार्गावरच जगाचे कल्याण आहे, असा संदेश देणाऱ्या ‘जनपद कल्याणी आम्रपाली’ या महानाट्याच्या भव्यदिव्य आविष्कारी सादरीकरणाने नागपूरकर रसिक मंत्रमुग्ध झाले.
हनुमाननगर येथील ईश्वर देशमुख शारिरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणावर सुरू असलेल्या चौथ्या खासदार सांस्कृतिक महोत्सवात बुधवारी नागपूरच्या कलाकारांनी साकारलेल्या ‘आम्रपाली’ महानाट्याचे सादरीकरण झाले. ४५०हून अधिक कलाकारांचा सहभाग असलेल्या महानाट्यामधील नृत्यकला, तलवारबाजी आणि फटाक्यांच्या आतषबाजीने नागपूरकरांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. नाटकाचे लेखक प्रेम कुमार उके होते तर दिग्दर्शक हर्ष कुमार यादव होते.
कांचन गडकरी व इतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने सहाव्या दिवसाच्या कार्यक्रमाची सुरुवात झाली. याप्रसंगी माजी आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे, माजी आमदार नाना शामकुळे, ॲड. सुलेखा कुंभारे, डॉ. चंदशेखर मेश्राम, डॉ. पुरणचंद्र मेश्राम, प्रा. संजय दुधे, समाजकल्याण उपायुक्त सिद्धार्थ गायकवाड, सहायक आयुक्त समाजकल्याण बाबासाहेब देशमुख, धर्मपाल मेश्राम, संदीप जाधव व नाटकाचे लेखक प्रेम कुमार उके उपस्थित होते.
या महानाट्यात भगवान बुद्धाची भूमिका लखन पडवार, सम्राट बिंबिसारची भूमिका कुणाल मिश्रा आणि आम्रपालीची भूमिका लाजरी काळे यांनी साकारली. नागपुरातील संयोनी मिश्रा, अश्विन वाघाले, सुभाष लखन, विपीन दुबे, नितीन सुपटकर, हर्षाली काईलकार, रचिता चिलबुले यांच्यासह इतर कलाकारांचाही सहभाग होता. नाटकाचे सहदिग्दर्शक आयुष तिवारी व शक्ती रतन होते तर नेपथ्य सतीश काळबांडे व प्रकाशयोजना किशोर बत्तासे यांनी सांभाळली. नृत्य दिग्दर्शन समीर पाटील व सह दिग्दर्शन जयश्री खेडकर यांचे होते.
यावेळी, खासदार सांस्कृतिक महोत्सव आयोजन समितीचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले, उपाध्यक्ष मधुप पांडे, गौरीशंकर पाराशर, अशोक मानकर, दिलीप जाधव, सचिव जयप्रकाश गुप्ता, कोषाध्यक्ष प्रा. राजेश बागडी, सदस्य बाळासाहेब कुलकर्णी, संजय गुलकरी, संदीप गवई, चेतन कायरकर, आशीष वांदिले, भोलानाथ सहारे, हाजी अब्दुल कादिर उपस्थित होते. संदीप गवई यांनी प्रास्ताविक केले तर संचालन रेणुका देशकर यांच्यासह मयूरेश गोखले व मृण्मयी कुळकर्णी यांनी केले.