नागपूर : भारतीय संस्कृती सांगीतिक चाली-ढालीमध्येही भिन्नता जपते. भारतीय शास्त्रीय संगीतात हिंदुस्थानी आणि कर्नाटकी या दोन भिन्न शैली स्वर-लय-तालाच्या बाबतीत वेगळ्या असल्या तरी या दोन्ही शैलीतून भारतीयत्व प्रकट होते. या दोन्ही सांगीतिक शैलीचा मिलाप म्हणजे संगीत रसिकांसाठी अद्भुत अनुपम असा क्षण असतो. मंगळवारी नागपूरकरांनी चौथ्या खासदार सांस्कृतिक महोत्सवात उत्तर-दक्षिण जुगलबंदीचा श्रवणाभिरम्य सोहळा अनुभवला.
महोत्सवाच्या पाचव्या दिवशी कांचन गडकरी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. याप्रसंगी दमक्षे सांस्कृतिक केंद्राचे संचालक डॉ. दीपक खिरवडकर, डॉ. पांडे, राहुल पांडे, डॉ. प्रमोद पडोळे, प्रकाश पोहरे, तनुजा नाफडे, जोसेफ राव, अरुण कोटेचा, शिव अग्रवाल, पूनम लाला उपस्थित होते.
संगीताचार्य पं. द.वी. काणेबुवा प्रतिष्ठानच्या वतीने भारतरत्न पं. भीमसेन जोशी जन्मशताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने खासदार सांस्कृतिक महोत्सवात उत्तर-दक्षिण जुगलबंदीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात बासरी वादक पं. राकेश चौरसिया व तबला वादक ओजस आडिया या हिंदुस्थानी शैलीच्या वादकांसोबच दक्षिण भारतीय कर्नाटकी शैलीचे बासरी वादक पं. शशांक सुब्रमण्यम व मृदंग वादक परुपल्ली फाल्गुन यांचा सहभाग होता. पं. राकेश चौरसिया व पं. शशांक सुब्रमण्यम यांच्या बासरीवादनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यांना तबल्यावर ओजस अडिया व मृदंगमवर परुपल्ली फाल्गुन यांनी दमदार संगत केली. या जुगलबंदीने नागपूरकरांची मने जिंकली.
यावेळी खासदार सांस्कृतिक महोत्सव आयोजन समितीचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले, उपाध्यक्ष मधुप पांडे, गौरीशंकर पाराशर, अशोक मानकर, दिलीप जाधव, सचिव जयप्रकाश गुप्ता, कोषाध्यक्ष प्रा. राजेश बागडी, सदस्य बाळासाहेब कुलकर्णी, संजय गुलकरी, संदीप गवई, चेतन कायरकर, आशिष वांदिले, भोलानाथ सहारे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणुका देशकर यांनी केले.
अभंग-भक्तिगीतांनी पं. भीमसेन जोशी यांना आदरांजली
कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात गानविदुषी मंजुषा पाटील, पं. उपेंद्र भट, नागेश अडगावकर, सौरभ नाईक यांनी पं. भीमसेन जोशी यांच्या भक्तिरचना सादर केल्या. मंजुषा पाटील, नागेश व सौरभ यांनी ‘जय जय राम कृष्ण हरी’ या भक्तिगीताने दुसऱ्या टप्प्याची दमदार सुरुवात केली. कार्यक्रमाचे निरुपण प्रकाश एदलाबादकर यांनी केले. गायकांनी आरंभी वंदीन, पंढरी निवासा, ज्ञानियांचा राजा, बाजे मुरलीया, काया ही पंढरी, माझे माहेर पंढरी, भाग्यदा लक्ष्मी, तीर्थ विठ्ठल, इंद्रायणी काठी या रचना सादर केल्या. ‘अगा वैकुंठीच्या राया’ ही भैरवी मंजुषा पाटील व पं. उपेंद्र भट यांनी एकत्र सादर करून कार्यक्रमाची सांगता केली.
.............