नागपूर : ग्रामीण भागातील महिला बचत गटांची दिवाळी गोड व्हावी, बचत गटांच्या महिलांनी तयार केलेल्या साहित्यांची विक्री करून महिलांच्या आर्थिक विकासात हातभार लावावा, या उद्देशाने जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने बचत गटांच्या महिलांचा ‘फराळ प्रशासनाच्या दारी’ हा उपक्रम राबविला आहे.
शहरात सरकारी कर्मचाऱ्यांचा जास्तीत जास्त वावर असलेल्या सिव्हील लाईन्स परिसरात महिला बचत गटांनी तयार केलेल्या दिवाळी फराळाचे स्टॉल लावण्यात येणार आहे. बचत गटांच्या साहित्याची जास्तीत जास्त विक्री व्हावी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांपासून सामान्य प्रशासनकडे सुद्धा कर्मचाऱ्यांना आवाहन करण्यासंदर्भात विनंती केली आहे.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत ग्रामीण भागातील महिलांच्या बचत गटांची चळवळ व्यापक व्हावी, या उद्देशाने विविध उपक्रम राबविले जातात. अभियानांतर्गत ग्रामीण भागातील महिलांनी तयार केलेल्या वस्तूंना योग्य बाजारपेठ मिळावी म्हणून प्रयत्न केले जातात. दिवाळीच्या काळात नोकरीपेशा महिलांना दिवाळीच्या तयारीला फार कमी वेळ मिळतो. त्या दिवाळीचा फराळ असो की साहित्य बाजारातूनच खरेदी करतात. त्यामुळे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने ग्रामीण भागातील घरगुती महिलांनी तयार केलेला रुचकर फराळ सरकारी कर्मचाऱ्यांच्या कार्यालयापर्यंत पोहोचविला आहे. प्रशासकीय इमारत क्रमांक २ समोर महिला बचत गटांचे स्टॉल लागणार आहे. येथे दिवाळीच्या फराळासह रांगोळ्या, पणत्याही उपलब्ध राहणार आहे.
- उद्योग आणि बँकिंग क्षेत्रालाही आवाहन
दिवाळीनिमित्त उद्योग क्षेत्रात आणि बँकिंग क्षेत्रात भेटवस्तू, सुकामेवा आणि फराळाच्या वस्तू भेट म्हणून दिल्या जातात. या भेटवस्तू आणि साहित्य महिला बचत गटांकडून खरेदी करून या महिलांना प्रोत्साहन मिळेल आणि त्यांना आत्मनिर्भर होण्यास मदत मिळेल, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी उद्योग आणि बँकिंग क्षेत्राला केले आहे.
शहरात प्रशासकीय इमारत क्रमांक २ समोर व तालुक्याच्या ठिकाणी पंचायत समितीच्या कार्यालयामध्ये स्टॉल लावण्यात येणार आहे. बचत गटांनी तयार केलेल्या फराळाच्या विक्रीसाठी सर्व शासकीय कार्यालयांना पत्र देऊन महोत्सवाला भेट देऊन खरेदीसाठी आवाहन करणार आहोत. जेणे करून महिलांना त्यांची चांगली विक्री व्हावी हा आमचा उद्देश आहे.
- विवेक इलमे, प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा