गणेश खवसे
नागपूर : एकीचे बळ... वज्रमूठ... सामूहिक प्रयत्न... याद्वारे समूहाची ताकद काय असते, त्याची निश्चितच प्रचिती येते. लाेकसहभागही त्याच श्रृंखलेत येताे आणि लाेकसहभाग वाढला,लाेकांनी एकत्रित काेणतेही काम हाती घेतले तर,अशक्य बाबही शक्य हाेते. लाेकसहभाग, लाेकवर्गणी आणि लाेकचळवळीतूनच भंगार, अडगळीत पडलेल्या पशुवैद्यकीय दवाखान्याला चक्क ‘फार्म हाऊस’चे रुप देण्यात आले. ही किमया नागपूर जिल्ह्यातील चारगाव (ता. उमरेड) येथील ग्रामस्थ आणि पशुधन पर्यवेक्षकांनी साधली आहे. त्यांनी केलेल्या या कार्याची आता चहुबाजूने चर्चा हाेत आहे.
चारगाव हे तसे छाेटेसे गाव. लाेकसंख्या जेमतेम ६०० च्या घरात. मात्र जेवढी तिथे लाेकसंख्या आहे, तेवढेच पशुधन त्या गावात आहे. साधारणत: ७० कुटुंब हे पशुधनावरच अवलंबून आहेत. म्हणजे दूध आणि दुधापासून तयार हाेणारे पदार्थ विकून त्यांचा उदरनिर्वाह चालताे. अशात जनावरांना राेगराईने ग्रासले, ऋतुमानानुसार हाेणाऱ्या राेगाची लागन झाल्यास त्यांच्यासमाेर माेठा प्रश्न निर्माण व्हायचा. गावात श्रेणी-२ मध्ये येणारा पशुवैद्यकीय दवाखाना असूनही ताे अडगळीत असा हाेता. त्यामुळे त्या दवाखान्याकडेही पशुपालकांची नेहमीच पाठ हाेती. अशात वर्षभरापूर्वी २२ फेब्रुवारी २०२१ ला पशुधन पर्यवेक्षक म्हणून डाॅ. पवन भागवत हे रुजू झाले. काहीतरी नवीन करण्याची तगमग, लाेकांचा सहभाग वाढवून दवाखान्याचा कायापालट करण्याचा त्यांनी निर्धार केला. त्याच ध्येयातून त्यांनी रुपरेषा आखली. त्यानुसार कार्य केले आणि बघता - बघता लाेकवर्गणीतून ६५ हजार रुपये जमा झाले. काहींनी आवश्यक वस्तू (पंखा, खुर्च्या आदी) दिल्या. नंतर चारगाव यंग ब्रिगेड तयार करून या दवाखान्याचे पूर्ण रुपच बदलून टाकले. साेबतच विविध उपक्रम राबवून लाेकसहभाग वाढविला.
या कामी गावातील नागरिक वेळ मिळेल तसे काम करू लागले. बांधकामासाठी मदत, इलेक्ट्रिकची कामे करणे यासह इतर कार्यात हातभार लावू लागले. विशेष म्हणजे दिवसा माेल-मजुरी करणारे नागरिक या दवाखान्याच्या कामासाठी रात्री उशिरापर्यंत झटले. पशुवैद्यकीय दवाखान्याचे रुप पालटल्यानंतर आता लाेकसहभागाची चळवळ चारगाववासीयांना चांगल्या पद्धतीने पटली आहे. त्यामुळे आता काेणतेही कार्य असाे, लाेकसहभागातून ‘काहीही साध्य करू’ असा निर्धारच ग्रामस्थांनी केला आहे.
अन् ग्रामस्थांची पायपीट थांबली
चारगाव येथील पशुपालक हे डेअरीवर दूध नेण्यासाठी दरराेज चारगाव ते बेला असा प्रवास करायचे. उन्हाळा, हिवाळा असाे की, पावसाळा, त्यांची पायपीट कायम असायची. त्यातच काेराेना काळात त्यांचे प्रचंड हाल झाले. त्यामुळे या ग्रामस्थांची पायपीट थांबली जावी, यासाठी गावातच डेअरीची व्यवस्था झाली तर, अशी कल्पना डाॅ. पवन भागवत यांच्या डाेक्यात आली. त्यादृष्टीने प्रयत्न केले आणि गावात आता डेअरी सुरू झाली. १२० लीटर दूध विकणारे गाव आता ३७० लीटर पर्यंतचे दूध विक्री करीत आहे.
चारगावमध्ये राबविण्यात आलेले उपक्रम
- गावातच आता दुग्धविक्री करण्यासाठी डेअरीची व्यवस्था झाली.
- पशुपालकांना मार्गदर्शन करण्यासाठी पशुसंवर्धन कट्टा तयार केला.
- गाे- संवर्धन पुस्तक दालन तयार केले.
- दवाखाना परिसरात खर्रा,गुटखा,सिगारेट बंदी, ५०० रुपये दंड.
- टाकाऊ वस्तू पासून टिकाऊ असा टायरचा झुला आणि खुर्च्या.
चारगावच्या ग्रामस्थांच्या अडचणी लक्षात घेता त्या दूर करण्याच्या दृष्टीने प्रयत्न राहिले. त्यात अपेक्षित लाेकसहभागही मिळाला. गावात डेअरी नव्हती,ती सुरू झाल्याने,येथील दूध आता थेट डेअरीवर विकले जाते. त्यासाठी पायपीटही करावी लागत नाही. १२० लीटर दूध विकणारे गाव आता ३७० लीटर दूध डेअरीवर विकतात. पशुसंवर्धन आणि त्याअनुषंगाने त्यांना नेहमीच मार्गदर्शन केले जाते.
- डाॅ. पवन भागवत,
पशुधन पर्यवेक्षक,पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी -२, चारगाव, ता. उमरेड.