सुनील चरपे
लाेकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर शहरासाेबतच तालुक्याच्या शहरांच्या परिसरात तसेच राष्ट्रीय व राज्य महामार्गालगत आलिशान ‘फार्म हाऊस’ उभारले आहेत. बहुतांश ‘फार्म हाऊस’चा वापर राहण्यासाठी कमी आणि अवैध व अनैतिक धंंद्यांसाठी अधिक केला जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. मूळ संकल्पनेला तिलांजली देणाऱ्या व महसूल बुडविणाऱ्या या ‘फार्म हाऊस’ बांधकामाला राज्य सरकारच्या काेणत्या विभागाने परवानगी दिली, हा प्रश्न अनुत्तरित आहे.
नागपूर शहराला जाेडलेल्या नऊ महत्त्वाच्या मार्गालगत ७८५ पेक्षा अधिक ‘फार्म हाऊस’ आहेत. मुळात राहण्यासाठी किंवा शेतीपयाेगी कामासाठी शेतात घर बांधण्याची महसूल विभाग परवानगी देते. कर्ज घ्यायचे असल्यास त्या घराची ग्रामपंचायतकडे नाेंद करावी लागते. महसुली भाषेत याला ‘शेत घर’ संबाेधले जाते. शेत घर बांधावयाचे असल्यास जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी किंवा तहसीलदारांकडून परवानगी घ्यावी लागते. ‘मेट्राे रिजन’मधील ‘फार्म हाऊस’ला जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी अनिवार्य असते. मात्र, बहुतांश ‘फार्म हाऊस’च्या महसूल विभागाकडे नाेंदी नाहीत.
कुही तालुक्यातील तितूर-पिपळा व मांगली शिवारातील दाेन ‘फार्म हाऊस’मध्ये खून व दराेड्याच्या घटना घडल्या आहेत. नागपूर-सावनेर-ओबेदुल्लागंज (भाेपाळ) मार्गालगतच्या तसेच हिंगणा तालुक्यातील ‘फार्म हाऊस’चा वापर दारू पार्टी करणे व जुगार खेळण्यासाेबत अनैतिक शरीरसंबंध प्रस्थापित करण्यासाठी केला जात असल्याने शहरी शाैकिनांची ‘फार्म हाऊस’ ही पहिली पसंती बनली आहे. मात्र नाेंदी नसल्याने पाेलीस कारवाईत ‘फार्म हाऊस’ मालक अडकले नाहीत.
शासनाचा महसूल बुडताेय
महसूल विभागाने निवासी, औद्याेगिक व वाणिज्यिक या तीन भागात शेत घराची विभागणी केली आहे. निवासी घरापेक्षा दीडपट औद्याेगिक तर दुप्पट कर वाणिज्यिक शेत घरावर आकारला जाताे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये प्रति चाैरस मीटरप्रमाणे कर निर्धारण केले जाते. नागपूरसह जिल्ह्यातील अन्य शहरांलगतच्या ‘फार्म हाऊस’ बांधकामाची महसूल विभागाकडे नाेंद नसल्याने शासनाला दरवर्षी लाखाे रुपयांच्या महसुलावर पाणी फेरावे लागते. महसूल बुडव्यांमध्ये माेठ्या नेत्यांचाही समावेश आहे.
काेंढाळी-नागपूर-माैदा मार्ग
काेंढाळी-नागपूर-माैदा या राष्ट्रीय महामार्ग-६ लगत व परिसरात किमान ३०० ‘फार्म हाऊस’ आहेत. काेंढाळी परिसरातील रिंगणाबाेडी येथील ‘फार्म हाऊस’मधून आठ क्विंटल गांजा जप्त केला हाेता. याच शिवारातील दुसऱ्या ‘फार्म हाऊस’मधून ३६ जुगाऱ्यांना अटक करून त्यांच्याकडून ४३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला हाेता. सातनवरी परिसरातील एका ‘फार्म हाऊस’मध्ये इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेट सामन्यांवर सट्टा स्वीकारला जायचा. या ‘फार्म हाऊस’मधून १५ लाखाचा मुद्देमाल जप्त केला हाेता.
बुटीबाेरी-नागपूर-देवलापार मार्ग
बुटीबाेरी-नागपूर-देवलापार या राष्ट्रीय महामार्ग-७ लगत व परिसरात किमान २०० ‘फार्म हाऊस’ आहेत. या ‘फार्म हाऊस’चा वापर जुगार खेळणे, दारू पार्टी करणे यासह अन्य अवैध कामांसाठी केला जाताे. काही ‘फार्म हाऊस’ प्रेमीयुगुलांना अनैतिक शरीर संबंध प्रस्थापित करण्यासाठी उपलब्ध करून दिले जातात.
महसूल अधिकाऱ्याचे काेट
महसुली भाषेत ‘फार्म हाऊस’ची व्याख्या शेतात राहणे व शेतीपयाेगी कामे, शेतमाल उत्पादन वाढविणे यासाठी घराचे बांधकाम करणे अशी केली आहे. शेत घरांच्या बांधकामाला महसूल विभागाच्या परवानगीची गरज नसते. अलीकडे ऐशाेआरामासाठी ‘फार्म हाऊस’चे बांधकाम केले जाते. त्याच्या बांधकामाची परवानगी व नाेंदी असायला हव्या. त्यामुळे महसूल गाेळा करणे साेपे जाईल.
- महसूल विभागातील अधिकारी