दयानंद पाईकराव, नागपूर : पत्नीच्या नावावर असलेली शेती विकून ५९ लाख रुपये घेतल्यानंतर रजिस्ट्री करून देण्यास टाळाटाळ करणाऱ्या आरोपीविरुद्ध अजनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
दुधराम लाकडुजी सव्वालाखे (५९, रा. गजानननगर, ओमकारनगर) असे आरोपीचे नाव आहे. आरोपी दुधरामच्या ५४ वर्षाच्या पत्नीच्या नावावर पाचपावली ग्रामपंचायत मानापूर रामटेक येथील २३.२५ एकर शेती आहे. या शेतीचा सौदा आरोपी दुधरामने विरास्वामी व्यंकटेश्वरराव कोनाबतुला (५४, रा. अरोली ता. मौदा, जि. नागपूर) यांच्यासोबत ५४ लाख ५० हजार रुपयात आपल्या राहत्या घरी केला. तसेच आरोपीच्या ताब्यातील अरुण जयस्वाल यांच्या मालकीची मौजा पाचपावली ग्रामपचायत मानापूर ता. रामटेक येथील ५.९७ एकर जमिनीचा सौदा ५ लाख ११ हजारात केला. दोन्ही शेत जमिनीचा विक्रीचा करारनामा आरोपी दुधरामने करून देऊन विरास्वामी यांच्याकडून ५९ लाख ६१ हजार रुपये घेतले.
करारनामा झाल्यानंतर काही दिवसांनी आरोपी दुधरामने शेतीवर धरमपेठ महिला अर्बन क्रेडिट को-ऑप. नागपूरचे कर्ज असून त्याची एनओसी घेणे आवश्यक असल्याचे सांगून रजिस्ट्री करून देण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर विरास्वामी यांना शिविगाळ करून खोटया गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली. विरास्वामी यांच्या तक्रारीवरून अजनी पोलिसांनी आरोपी विरुद्ध कलम ४०६, ४२०, ५०४, ५०६, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. तपास आर्थिक गुन्हेशाखा करीत आहे.