बेला : सततची नापिकी, कर्जबाजारीपण व कर्ज वसुलीचा तगादा याला कंटाळून शेतकऱ्याने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना बेला (ता. उमरेड) शिवारात गुरुवारी (दि. २१) दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास घडली.
मारुती शामराव वरघने (४४, रा. बेला) असे मृताचे नाव आहे. त्यांच्याकडे चार एकर शेती असून, यावर्षी त्यांनी कपाशीची लागवड केली हाेती. त्यांनी तीन वर्षांपूर्वी महिंद्रा फायनान्सकडून १ लाख ३० रुपयांचे कर्ज घेतले हाेते. पाच दिवसांपूर्वीच त्यांनी कर्जाचा हप्ता भरला हाेता. त्यांनी सावकाराकडून तीन लाख रुपयांचे कर्ज घेतले हाेते, असेही त्याने सांगितले. कर्ज वसुलीचा तगादा वाढला हाेता. त्यातून अपमानित केले जायचे असा आराेप मृताचा मुलगा मुकेश वरघने (२३) याने केला आहे. याच चिंतेत त्यांनी शेतात गळफास लावून जीवनयात्रा संपविली. याप्रकरणी बेला पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद करून तपास सुरू केला आहे.