अकोला: सातत्याने होणार्या शेतकर्यांच्या आत्महत्या बघता, त्यांना अप्रिय निर्णयापासून परावृत्त करण्यासाठी योग्य समुपदेशनाची गरज असून, अकोल्याला असे शेतकरी समुपदेशन केंद्र (अँग्रो कौन्सेलिंग सेंटर) मिळावे, यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवणार असल्याची माहिती डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी यांनी शुक्रवारी दिली. शेतकरी आत्महत्येचे लोण संपूर्ण राज्यात पसरले आहे. त्यांना या टोकाच्या विचारांपासून परावृत्त करण्यासाठी विविध स्तरांवर उपाययोजना केल्या जात असल्या तरी त्यांचे सूक्ष्म समुपदेशन करणे महत्त्वाचे ठरणार आहे. नैराश्य आलेल्यांपैकी काही शेतकरी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतात. त्यांच्या नैराश्येची पातळी शेतकर्यांच्या पत्नीच्या लक्षात आलेली असते. अशा शेतकर्यांचे समुपदेशन केंद्रातील तज्ज्ञाकरवी केल्यास त्यांना आत्महत्येपासून परावृत्त करणे निश्चितच सोपे होईल. त्यासाठी शेतकरी समुपदेशन केंद्र आवश्यक आहे. दीक्षांत समारंभाला येत असलेल्या मंत्रिमहोदयांकडे ही मागणी करणार असल्याचे डॉ. दाणी यांनी दीक्षांत समारंभाची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. सेंद्रिय उत्पादनांना परदेशात चांगली बाजारपेठ आहे; परंतु या उत्पादनांची गुणवत्ता तपासून परदेशात पाठवण्यासाठी योग्य परीक्षणाची गरज असते. हे परीक्षण करण्यासाठी या कृषी विद्यापीठाला सर्टिफिकेशन एजंसी द्यावी, अशी मागणी करणार असल्याचे कुलगुरूंनी सांगितले. येथे परीक्षण झाले तर विदर्भातील सेंद्रिय पदार्थ, उत्पादनाला वाव मिळेल. पारंपरिक पद्धतीने माती परीक्षणास वेळ लागत असल्याने झटपट माती परीक्षण करू न देणारे लेझर तंत्रज्ञान उपलब्ध आहे. यासाठीचा करार अमेरिकेतील टेक्सास विद्यापीठाशी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने केल्याचेही ते म्हणाले. कृषी विद्यापीठाच्या एके-५ व एके-७ या देशी कपाशीच्या जाती कोरडवाहू क्षेत्रात चांगले उत्पादन देत असल्याने, त्यांच्या बियाणे निर्मितीवर भर देण्यात येत असून, बुलडाणा जिल्ह्यातील आप्पासाहेब गुंजकर यांनी या देशी कापसाच्या बियाणे निर्मितीला सुरुवात केली आहे. विद्यापीठाला कायमस्वरू पी पाण्याचा स्रोत निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. मध्यवर्ती संशोधन केंद्राच्या गुडधी विभागांतर्गत येणारा नाला व वणी रंभापूर येथील मुख्य बिजोत्पादन केंद्रांतर्गत जलयुक्तशिवार कार्यक्रमाची कामे केली जाणार असल्याचे ते म्हणाले.
शेतकरी समुपदेशन केंद्र उभारणार- रविप्रकाश दाणी
By admin | Published: February 05, 2016 2:08 AM