लाेकमत न्यूज नेटवर्क
पारशिवनी : शेतात सऱ्या तयार करण्याचे काम करीत असतानाच शेतकऱ्याचा विजेच्या जिवंत तारेला स्पर्श झाला आणि त्याला जाेरात विजेचा धक्का लागला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. ही घटना पारशिवनी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील उमरी पाली शिवारात शुक्रवारी (दि. १८) दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली.
पंकज शंकर भुर्रे (३५, रा. उमरी पाली, ता. पारशिवनी) असे मृताचे नाव आहे. पंकज त्याच्या स्वत:च्या शेतात सऱ्या (सारण्या) तयार करण्यासाठी गेला हाेता. त्याचा शेतात पडलेल्या ११ केव्ही क्षमतेच्या विजेच्या जिवंत तारेला स्पर्श झाल्याने त्याला जाेरात विजेचा धक्का लागला. त्यातच त्याचा घटनास्थळी मृत्यू झाला. माहिती मिळताच कुटुंबीयांसह पाेलीस व गावातील नागरिक घटनास्थळी दाखल झाले.
घटनास्थळी आकाश दिवटे, राधेश्याम नखाते, बंटी जयस्वाल, चंद्रशेखर राऊत, भूपेंद्र खोब्रागडे यांच्यासह अन्य शेतकऱ्यांनी शेतातच ठिय्या आंदाेलन करायला सुरुवात केल्याने पेच निर्माण झाला हाेता. महावितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे पंकजचा मृत्यू झाल्याचा आराेप शेतकऱ्यांनी केला. दाेषींवर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर पेच निवळला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पारशिवनी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला.
पंकज घरातील कर्ता पुरुष हाेता. त्याला तीन अपत्ये असल्याची माहिती निकटवर्तीयांनी दिली. याप्रकरणी पारशिवनी पाेलिसांनी नाेंद करून तपास सुरू केला आहे.
...
शेतकऱ्यांचे ठिय्या आंदाेलन
पाेलीस उपनिरीक्षक ज्ञानाेबा पळनाटे व महावितरण कंपनीचे उपविभागीय अभियंता आशिष तेजे घटनास्थळी दाखल हाेताच गावातील शेतकऱ्यांनी घटनास्थळी ठिय्या आंदाेलन करायला सुरुवात केली. या घटनेला दाेषी असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करा तसेच मृताच्या कुटुंबीयांना आर्थिक माेबदला द्या, अशी मागणी शेतकऱ्यांनी रेटून धरली हाेती. आशिष तेजे यांनी दाेषींवर कारवाई करण्याचे व शासकीय नियमानुसार माेबदला देण्याचे आश्वासन दिल्यानंतर तीन तासांनी आंदाेलन मागे घेण्यात आले.