जलालखेडा : शेतातील मचाणावर जागली करीत असताना सापाने दंश केल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना जलालखेडा नजीकच्या हिवरमठ शिवारात शनिवारी (दि.२१) रात्री ११.३० वाजताच्या सुमारास घडली.
रामकृष्ण नत्थूजी भादे (७२, रा. हिवरमठ, ता. नरखेड) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. रामकृष्ण हे शेतात जागली करायला गेले हाेते. दरम्यान, शेतातील मचाणावर झाेपले असताना, त्यांच्या कानाजवळ सापाने दंश केला. ही बाब ध्यानात येताच ते घरी परत आले व घटनेची माहिती कुटुंबीयांना दिली. लगेच त्यांना मेंढला येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात नेण्यात आले. तिथे प्राथमिक उपचार केल्यानंतर प्रकृती गंभीर असल्याने नागपूरला रवाना करण्यात आले. जामगाव परिसरात त्यांची प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना खासगी दवाखान्यात नेले असता, डाॅक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घाेषित केले. घटनेची माहिती मिळताच जलालखेडा पाेलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. याप्रकरणी जलालखेडा पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद केली असून, तपास सुरू केला आहे. कुटुंबातील कर्ता व्यक्ती असलेल्या रामकृष्ण यांच्या मृत्यूमुळे भादे कुटुंबावर दु:खाचा डाेंगर काेसळला आहे. मृताच्या कुटुंबीयांना शासनाने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी नागरिकांची आहे.