सुरेश द्वादशीवार यांचे प्रतिपादन : मराठी शेतकरी साहित्य संमेलननागपूर : दिवंगत शरद जोशी यांनी शेतकरी चळवळ मोठी केली. शेतकऱ्यांबाबत त्यांनी प्रचंड लिखाण केले. त्यांंचे साहित्य इतके मोठे होते की ते कुठल्याही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होऊ शकले असते. परंतु त्यांच्या लिखाणाला मान्यता दिली नाही हा आमच्या साहित्यिकांचा करंटेपणा होता. मराठी साहित्य दरिद्री राहण्यामागंच खरं कारण म्हणजे खऱ्या चळवळीशी कधी जुळवूनच घेतलं नाही. महात्मा गांधींशी जुळवून घेतले नाही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशीही कुठे जुळवून घेतले. दलित चळवळ आणि साहित्य पुढे आले तेव्हा कुठे त्याची दखल घेतल्या गेली. शेतकऱ्यांचे साहित्यही असे दलित साहित्याप्रमाणे पुढे यावे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार लोकमतचे संपादक आणि ज्येष्ठ साहित्यिक प्रा. सुरेश द्वादशीवार यांनी येथे केले. डॉ. वसंतराव देशपांडे सभागृह येथे दोन दिवसीय दुसरे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. ज्येष्ठ साहित्यिक रा.रं. बोराडे हे संमेलनाध्यक्ष होते तर ज्येष्ठ पत्रकार राजीव खांडेकर हे प्रमुख अतिथी होते. शेतकरी नेते वामनराव चटप हे स्वागताध्यक्ष होते. शेतकरी साहित्य चळवळीचे अध्यक्ष गंगाधर मुटे, राम नेवले, संध्या राऊत व्यासपीठावर होते. प्रा. सुरेश द्वादशीवार म्हणाले, एकीकडे ४० हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, अशी बातमी आहे तर दुसरीकडे देशात प्रचंड गुंतवणूक झाल्याची बातमी आहे. देशात येणाऱ्या या गुंतवणुकीत मरणाऱ्या शेतकऱ्यांशी काही संबंध आहे की नाही, याचा विचारच होत नाही. कारण आमच्या संवेदनात बोथट झाल्या आहेत. ७५ टक्के लोकं खेड्यात राहतात. परंतु कोणताही पंतप्रधान स्मार्ट खेडी बनवण्याची भाषा बोलत नाही, असा चिमटाही त्यांनी काढला. शरद जोशी यांनी शेतकरी चळवळीला गती दिली. त्यांच्या संमेलनाला ५-५ लाख लोक एकत्र यायचे. जोपर्यंत शेतीच्या मालाला भाव मिळावा, अशी त्यांची मागणी होती, तेव्हापर्यंत लोकं त्यांच्यासोबत होते. परंतु शेतकऱ्यांच्या सबलीकरणासाठी त्यांची राजकीय शक्ती उभी करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि राजकीय पक्ष स्थापन केला तेव्हा लोकांना त्यांची जात आठवली. गरिबांच्या किंवा शेतकऱ्यांच्या चळवळीत जोपर्यंत लोक आपली जात धर्म विसरून एकत्र येणार नाही, तोपर्यंत या व्यथा अशाच राहतील. अलीकडे शेतकरी साहित्याबद्दल चांगले लिहिले जात आहे. त्यांना बळ द्या, असेही ते म्हणाले. राजीव खांडेकर यांनीसुद्धा दिवंगत शरज जोशी यांच्या विपुल साहित्यावर प्रकाश टाकला. तसेच डॉ. आंबेडकरांचे विचार त्यांच्या अनुयायांनी ज्या प्रमाणे पुढे नेले, त्याच प्रमाणे शेतकरी चळवळ सुद्धा पुढे नेण्यात यावी, असे आवाहन त्यांनी केले. अॅड. वामनराव चटप यांनी पत्रकार आणि साहित्यिकांनी शेती व शेतकऱ्यांच्या व्यथा मांडून त्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधावे. लोकांच्या संवेदना जागृत व्हाव्यात असे लेखन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी ‘कणसातील माणसं’, नागपुरी तडका या काव्यसंग्रहासह ‘शेतकऱ्यांचा सूर्य’ या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. गंगाधर मुटे यांनी प्रास्ताविक केले. मनिषा रिठे यांनी संचालन केले. तर राम नेवले यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)महासत्तेकडे वाटचाल म्हणजे अफूची गोळी देणे - रा.रं. बोराडे ज्येष्ठ साहित्यिक रा.रं. बोराडे आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले, आपला देश महासत्तेकडे वाटचाल करीत आहे, असं म्हणणे म्हणजे जनतेला अफूची गोळी देणे आहे. हे खर मानलं तरी एक प्रश्न उपस्थित होतो. माझा एक नातू हैदराबाद येथील एका इंग्रजी शाळेत शिकतो. माझ्या शेतकरी भावाचा एक नातू माझ्या गावच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकतो. माझ्या शेतकरी भावाचा हा नातू माझ्या नातवाच्या हातात हात घालून महासत्तेकडे जाणार आहे का? नसल्यास महासत्तेच्या अशा फुशारक्या मारण्यात काय अर्थ आहे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. शेतीच्या समस्येच्या मुळाचा आपण विचार करण्याची गरज आहे. आता सर्व अल्पभूधारक झाले आहेत. अशा परिस्थितीत केवळ रस्त्यावर उतरणेच आपल्या हातात आहे. शेतकरी शेतात काम करता करता जगला पाहिजे ही भूमिका घेऊन रस्त्यावर उतरावे, असे आवाहन त्यांनी केले. शेतकऱ्यांच्या आत्महत्या या फॅशन झाल्याबाबत खासदार गोपाळ शेट्टी यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेधही यावेळी त्यांनी केला.
शेतकरी साहित्यही पुढे यावे
By admin | Published: February 21, 2016 2:51 AM