लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : एकीकडे पाकिस्तान दररोज सीमेवर आपल्या जवानांचे बळी घेत आहे. निष्पाप लोकांवर गोळीबारी करीत आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानला ठोस उत्तर देण्याचे सोडून भाजपा सरकारने देशात साखरेचे विक्रमी उत्पादन झाले असताना पाकिस्तानच्या शेतकऱ्यांना जगविण्यासाठी तेथील साखर आयात केली. तेव्हा आता आपल्या देशातील शेतकऱ्यांना जगवायचे आहे की पाकिस्तानच्या शेतकऱ्यांना हे भाजप सरकारनेच स्पष्ट करावे, अशा शब्दात माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी चिमटा काढला.भंडारा-गोंदिया पोटनिवडणुकीत प्रचारासाठी जात असताना नागपुरात पत्रकारांशी ते बोलत होते. अजित पवार म्हणाले, आज आत्महत्या करणारे शेतकरी थेट मुख्यमंत्र्यांच्या नावाने चिठ्ठ्या लिहित आहेत. सरकारच्या धोरणाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे चिठ्ठीद्वारे सांगत आहे. हे एकप्रकारचे भाजप-शिवसेना सरकारचे अपयश असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. निरंजन डावखरे यांनी भाजपात प्रवेश केल्याबाबत विचारले असता पवार यांनी सांगितले की, स्वत:च्या स्वार्थासाठी त्यांनी पक्ष सोडला. राजकारणात काही लोकं उगवत्या सूर्याला नमस्कार करणारे असतात तर काही जण निष्ठा पाळणारे असतात. त्यामुळे ते चालतच राहते. नागपुरात होत असलेल्या पावसाळी अधिवेशनाबाबत त्यांना विचारले असता अधिवेशन कुठे घ्यावे, हा सरकारचा अधिकार आहे. त्याला आपला पाठिंबा राहील. सरकारला जाब विचारण्याचे आमचे काम आहे, अधिवेशन कुठेही झाले तरी ते आम्ही करूच, असेही त्यांनी स्पषट केले.मित्रपक्षासोबत भाजपाची वागणूक चांगली नाही. राजू शेट्टी नाराज आहेत. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातील बातम्या पाहता शिवसेनाही नाराज असल्याचे दिसून येते. विनायक मेटे यांना अजूनही मंत्री करण्यात आले नाही. एकूणच गाजर दाखविण्यात येत असल्याने नाराज असल्याचेही ते म्हणाले. यावेळी माजी मंत्री अनिल देशमुख आणि आ. प्रकाश गजभिये उपस्थित होते.
शेतकरी पाकिस्तानचा जगवायचा की भारताचा ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 8:48 PM
एकीकडे पाकिस्तान दररोज सीमेवर आपल्या जवानांचे बळी घेत आहे. निष्पाप लोकांवर गोळीबारी करीत आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानला ठोस उत्तर देण्याचे सोडून भाजपा सरकारने देशात साखरेचे विक्रमी उत्पादन झाले असताना पाकिस्तानच्या शेतकऱ्यांना जगविण्यासाठी तेथील साखर आयात केली. तेव्हा आता आपल्या देशातील शेतकऱ्यांना जगवायचे आहे की पाकिस्तानच्या शेतकऱ्यांना हे भाजप सरकारनेच स्पष्ट करावे, अशा शब्दात माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी चिमटा काढला.
ठळक मुद्देअजित पवार यांनी काढला चिमटा : प्राधान्य कशाला, सरकारनेच स्पष्ट करावे