नागपूर : नाल्याला आलेला पूर ओलांडत असताना बैलगाडी प्रवाहात आली आणि बैलगाडीवरील शेतकऱ्यासह त्याची पत्नी व अन्य दाेन महिला वाहत गेल्या. त्या शेतकऱ्याला दाेन महिलांना वाचविण्यात यश आले. मात्र, त्याच्या पत्नीचा मृत्यू झाला. ही घटना जलालखेडा (ता. नरखेड) मेंढला नजीकच्या रामठी शिवारात गुरुवारी (दि. २३) दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली.
वंदना वामन सवई (४०, रा. रामठी, ता. नरखेड) असे मृत महिलेचे नाव आहे. ती पती वामन व अन्य दाेन महिला मजुरांसाेबत स्वत:च्या शेतात भुईमुगाच्या शेंगा काढायला गेली हाेती. दुपारी मुसळधार पावसाला सुरुवात झाल्याने चाैघेही बैलगाडी बसून घराकडे निघाले. पावसामुळे वाटेत असलेल्या शिंपी नाल्याला पूर आला हाेता. पाणी कमी असल्याने वामन यांनी पुरात बैलगाडी टाकून पूर ओलांडण्याचा प्रयत्न केला.
प्रवाहात येताच बैलगाडीसह चाैघेही वाहायला सुरुवात झाली. यात वामन व दाेन महिला बचावल्या. याबाबत माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळ गाठले व पाेलिसांना सूचना दिली. पाेलिसांना काही वेळात वंदना यांचा मृतदेह आढळून आला. बीट जमादार पुरुषाेत्तम धाेंडे यांनी ठाणेदार हरिश्चंद्र गावडे, तलाठी वाहाणे, पाेलीस पाटील प्रफुल्ल मुसळे यांच्या उपस्थितीत पंचनामा केला.
पत्नीला वाचविण्यात अपयश
सर्व जण बैलगाडीत एकमेकांचे हात धरून बसले हाेते. बैलगाडी वाहायला सुरुवात हाेताच वंदना यांनी पतीचा धरलेला हात सुटला. त्यांच्यासाेबत इतर दाेन महिलाही पाण्याच्या प्रवाहात आल्या हाेत्या. वामन सवई यांना पाेहता येत असल्याने त्यांनी आधी दाेन महिलांना पुरातून बाहेर काढले. ताेपर्यंत वंदना दूरपर्यंत वाहून गेल्या हाेत्या.