लोकमत न्यूज नेटवर्क
उमरेड : केंद्रीय कापूस संशोधन संस्थेच्या वतीने तालुक्यातील धुरखेडा येथे पोषण वाटिका महाअभियानांतर्गत शेतकरी-शास्त्रज्ञ परिसंवादाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. अनुसूचित जाती उपयोजनेंतर्गत पोषण वाटिका महाअभियान व वृक्षारोपण तथा कपाशीवरील एकात्मिक कीड व रोगव्यवस्थापन विषयावर एकदिवसीय चर्चासत्राचे आयोजन पार पडले.
केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे डॉ. एस. एम. वासनिक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी प्रभारी तालुका कृषी अधिकारी चंद्रशेखर कोल्हे, सरपंच महेश मरगळे, कृषी विभागाचे माजी उपसंचालक विजय गायकवाड यांची उपस्थिती होती. शास्त्रज्ञ डॉ. शैलेश गावंडे यांनी भरड धान्यांचे आहारातील महत्त्व व काळाची गरज विशद केली. अध्यक्षीय भाषणात डॉ. एस. एम. वासनिक यांनी संस्थेने विकसित केलेल्या कपाशीमधील तंत्रज्ञानाची तसेच त्याविषयी माहिती मिळविण्यासाठी उपलब्ध असलेल्या कॉटन ॲप व ई-ध्वनिसंदेश याबद्दल शेतकऱ्यांना अवगत केले. शास्त्रज्ञ डॉ. विवेक शहा, डॉ. दीपक नगराळे, प्रधान शास्त्रज्ञ डॉ. जयंत मेश्राम, प्रधान शास्त्रज्ञ सुनील महाजन, डॉ. सर्वानन, कृषी सहायक अरुण हारोडे यांनी विविध विषयांवर मौलिक माहिती दिली.
शेतकरी-शास्त्रज्ञ परिसंवादात शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांची उत्तरे शास्त्रज्ञांनी दिली. यावेळी वृक्षारोपण करण्यात आले. १८० शेतकऱ्यांना विविध भाजीपाल्याच्या बियाण्यांचे किट वितरित करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. शैलेश गावंडे यांनी केले. डॉ. नीलकंठ हिरेमणी यांनी आभार मानले. अक्षय कांबळे, अश्विन मेश्राम, विजय गायकवाड आदींनी सहकार्य केले.