पारशिवनी : कृषी विभागाच्यावतीने राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान गळीतधान्य व तेलताड (साेयाबीन) सन २०२१-२२ याेजनेंतर्गत शेतकरी प्रशिक्षण व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सकर्लाचे सरपंच प्रदीप दियेवार हाेते. प्रमुख पाहुणे म्हणून कृषितज्ज्ञ डाॅ. हरीश सवाई, प्रगतिशील शेतकरी सुरेश भगत, तालुका कृषी अधिकारी ए. टी. गच्चे, गेंदलाल सरपाते यांची उपस्थिती हाेती. पद्मश्री डाॅ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रशिक्षणाला सुरूवात झाली. प्रमुख मार्गदर्शक डाॅ. हरीश सवाई यांनी शेतकऱ्यांना साेयाबीन, कपाशी व धान पिकावरील प्रमुख राेग व कीड नियंत्रण व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले. तसेच ट्रायकाेडर्मा कार्ड, बीजप्रक्रिया, बुरशीजन्य राेग व उपाययाेजना, कामगंध सापळे, पिवळे-निळे चिकट सापळ्यांचा वापर व त्याचे फायदे यावर माहिती दिली.
सेंद्रिय पद्धतीने कीड नियंत्रण व त्यापासून हाेणाऱ्या फायद्यांचे महत्त्व प्रगतिशील शेतकरी सुखदेव गुरवे यांनी शेतकऱ्यांना पटवून दिले. यावेळी शेतकऱ्यांनी अनुभव व्यक्त केले. दशपर्णी अर्क, जिवामृत, निंबाेळी अर्क कसे बनवावे व चुकीचे कीटकनाशक फवारणीमुळे हाेणारे नुकसान याबाबत कृषी सहायक जे. बी. भालेराव, ए. एन. देशमुख यांनी शेतकऱ्यांना माहिती दिली. तालुका कृषी अधिकारी डाॅ. ए. टी. गच्चे यांनी हे प्रशिक्षण साेयाबीन, कपाशी व धान उत्पन्न वाढीसाठी उपयुक्त ठरेल, असे सांगितले. कपाशीचे क्षेत्र जास्त असून कीटकनाशके फवारण्या अधिक हाेतात. त्यामुळे किटकनाशके फवारणी करताना याेग्य काळजी घेण्याचे तसेच गुलाबी बाेंडअळी नियंत्रणाबाबत आणि पीक स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन ए. एन. देशमुख यांनी केले. कार्यक्रमाच्या आयाेजनासाठी मंडळ कृषी अधिकारी एस. आर. शेंडे, एम. के. बावणे, एस. पी. कुबडे, आर. डी. सोरमारे तसेच सर्व कृषी विभागातील कर्मचारी व ग्रामस्थांनी सहकार्य केले.
280821\img-20210828-wa0014.jpg
कृषी प्रशिक्षण