पंजाबराव देशमुख यांची पुण्यतिथी : महापौर नंदा जिचकार यांचा विश्वास नागपूर : डॉ. पंजाबराव देशमुख यांनी दाखविलेल्या मार्गावर आपण चालल्यास या देशातील शेतकरी नक्कीच सुखी आणि समृद्ध होईल, असा विश्वास महापौर नंदा जिचकार यांनी व्यक्त केला. डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या पुण्यतिथीनिमित्त अॅग्रोव्हेट-अॅग्रोइंजी मित्र परिवारातर्फे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. महाराजबाग चौकातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मारक परिसर येथे हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला अतिथी म्हणून आमदार परिणय फुके, उप महापौर दीपराज पार्डीकर, प्राचार्य बबनराव तायवाडे, मिलिंद राऊत, बी. एन. गणवीर, दिलीप मोहितकर व प्रणय पराते उपस्थित होते. यावेळी आ. परिणय फुके यांनी भंडारा व गोंदिया परिसरात पाण्याची भरपूर सुविधा असताना केवळ एकच पीक का घेतल्या जाते, यावर चिंता व्यक्त करून तेथील शेतकरी एकापेक्षा अधिक पिके कसा घेईल. यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. तसेच आगामी पावसाळी अधिवेशनात शेतकऱ्यासंबंधी बिल सादर करणार असून, त्यासाठी सध्या अभ्यास सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच मिलिंद राऊत यांनी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या १४ कलमी कार्यक्रमाची माहिती दिली. शिवाय सरकारने तालुका तसेच मेट्रो शहरात शेतकऱ्यांच्या माल विक्रीसाठी मॉल उभे करावेत, अशीही मागणी केली. यातून शेतकऱ्यांच्या शेतीमालाला चांगला भाव मिळेल. शिवाय शेतकरी हा थेट ग्राहकांना प्रक्रिया केलेला माल विक्री करू शकेल, असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाला शरद जिचकार, रमेश बोरकुटे, रमेश चोपडे, प्रवीण गायकवाड व सुधांशू मोहोड उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रणय पराते यांनी केले. डॉ. सुनील सहातपुरे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
...तर शेतकरी समृद्ध होईल...तर शेतकरी समृद्ध होईल
By admin | Published: April 13, 2017 3:16 AM