लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कृषी कायद्याच्या निषेधार्थ भारत बंदमध्ये नागपुरात जिल्ह्यातील एकूण १३ बाजार समित्यांपैकी सात बाजार समित्यातील व्यवहार पूर्णपणे बंद होते, तर नागपूर शहरातील कळमना येथील केवळ धान्य बाजार बंद होता. त्यामुळे कळमन्यात ५ कोटी आणि अन्य सात समित्यांमध्ये ६ कोटी असे एकूण ११ कोटींची उलाढाल झाली नाही.
बुधवारी बाजार समित्यांमधील सर्वच बाजार सुरळीत सुरू झाले. भाजीपाला व फळे वगळता मुख्यत्वे धान्य बाजारात मोठ्या प्रमाणात आवक झाली. धानाची आवक मोठ्या प्रमाणात होती. बुधवारी कळमन्यात जवळपास ६ हजार पोत्यांची आवक झाली. शेतकऱ्यांना २ ते २२०० रुपयांपर्यंत भाव मिळाला. सर्वच मालाची विक्री झाली. मंगळवारच्या तुलनेत बुधवारी दीडपट उलाढाल झाल्याचे व्यापारी आणि अडतियांनी सांगितले.
अतुल सेनाड म्हणाले, शेतकऱ्यांना कळमन्यात बंदची कल्पना होती, त्यांनी धान्य आणले नाही, पण पूर्वकल्पना नसलेल्या शेतकऱ्यांनी मंगळवारी धान्य विक्रीसाठी आणले. जवळपास १० ते १२ ट्रक बाजारात आले होते. सर्वांना अडकून राहावे लागले. त्यांना एक दिवसाचे गाड्यांचे भाडे अतिरिक्त भरावे लागले, हे नक्की. पण कृषी कायदा हा धान्याशी संबंधित असल्याने आणि व्यापारी आणि अडतियांना त्यातील तरतुदींचा पुढे त्रास होणार असल्याने आम्ही भारत बंदमध्ये सहभागी होऊन कायद्याचा निषेध केला.
सध्या सर्वच बाजार समित्यांमध्ये धानाची आवक होत आहे. याशिवाय काटोल, सावनेर येथे संत्रा मोठ्या प्रमाणात विक्रीला येत आहे. भारत बंदच्या पार्श्वभूमीवर भाजीपाला आणि विविध फळांची आवक अन्य राज्यातून होत असल्याने आणि नाशवंत वस्तू असल्याने या बाजारातील व्यवहार सुरू होते. अनेक शेतकऱ्यांना कळमना धान्य बाजार बंद राहण्याची कल्पना नसल्याने अनेकांनी सोमवारी रात्री धान आणि सोयाबीन बाजारात आणले. त्यामुळे त्यांना मंगळवारी बाजारात अडकून रहावे लागले. याशिवाय त्यांना एक दिवसाचे गाडीचे भाडे द्यावे लागले. या दिवशी व्यापारी आणि अडतियांनी आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवली होती. याशिवाय कृषी कायद्याचा निषेध करताना कळमना बाजारात आणि शहरात रॅली काढून कायद्याचा निषेध केला. नागपूर जिल्ह्यातील काटोल, सावनेर, कामठी, नरखेड, कळमेश्वर, पारशिवनी, हिंगणा या बाजार समित्यांवर काँग्रेस-राष्ट्रवादीचे वर्चस्व असल्याने भारत बंदमध्ये या समित्यातील व्यापारी आणि अडतियांनी सहभाग नोंदविला.
भारत बंदमध्ये कळमन्यातील सर्व बाजार सुरू ठेवण्याचा सूचना केल्या होत्या. त्यानुसार सर्व बाजार सुरू होते. पण धान्य बाजारातील व्यापारी आणि अडतिये भारत बंदमध्ये सहभागी झाले. त्यामुळे केवळ मंगळवारी त्याच बाजारात व्यवहार झाले नाहीत. पण बुधवारी या बाजारात मोठ्या प्रमाणात धान आणि सोयाबीनची आवक झाली आणि लिलावही झाले. याशिवाय भाजीपाला आणि फळांची आवक नेहमीप्रमाणे सुरू होती.
राजेश भुसारी, प्रशासक, कळमना कृषी उत्पन्न बाजार समिती.
भारत बंदची कल्पना नसल्याने कळमन्यात सोयाबीन विक्रीसाठी आणले होते. पण मंगळवारी बाजार बंद असल्याने मालाची विक्री झाली नाही. त्यामुळे कळमन्यात थांबावे लागले. सोयाबीन बाजारात आणून माल अडतियाकडे उतरविला आणि गाडी परत पाठविली. त्यामुळे वाहतुकीचे जास्त भाडे लागले नाही. बुधवारी संपूर्ण मालाची विक्री झाली.
विठ्ठल दगडे, शेतकरी, खरसोली (नागपूर तालुका.)
मंगळवारी कळमन्यात धान विक्रीसाठी आणले होते. पण बाजार बंद असल्याने विक्री झाली नाही. त्यामुळे बाजारात थांबावे लागले. सध्या बाजारात धानाची आवक वाढली आहे. त्यामुळे आपल्या मालाचे संरक्षण स्वत: केले. अडतियानेही माल आपल्या जबाबदारीवर आणण्याचे आवाहन केले होते. बुधवारी मालाची विक्री होऊन काही पैसेही मिळाले.
सुनील राऊत, शेतकरी, अड्याळी (नागपूर तालुका).
दिवसभरात ११ कोटींचे व्यवहार ठप्प
कळमन्यातील धान्य बाजारात मंगळवारी ५ कोटी आणि काँग्रेस-राष्ट्रवादीचे वर्चस्व असलेल्या सात बाजार समित्यांमध्ये जवळपास ६ कोटी असा एकूण ११ कोटींचा व्यवहार ठप्प होता. अनेक शेतकऱ्यांना कृषी माल आणल्यानंतर त्याच्या संरक्षणासाठी बाजारात थांबावे लागले. शिवाय मालवाहतुकीचे जास्तीचे भाडे भरावे लागले. कळमना धान्य बाजार अडतिया असोसिएशनने दोन दिवसांपूर्वीच भारत बंदमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे केवळ ९० टक्के शेतकऱ्यांनी माल बाजारात विक्रीसाठी आणला नाही. त्यामुळे बुधवारी धान आणि सोयाबीनची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. बाजारात उत्साह संचारला होता.