नागपूर : खरीप हंगामात अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे शेतकरी व शेतमजुरांना बिकट परिस्थितीचा सामना करावा लागत असून शासनाने शेतकरी, शेतमजुरांना दिलासा देण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने विधानभवनावर मोर्चा काढण्यात आला. पोलिसांनी टेकडी मार्गावर हा मोर्चा अडवून धरला. मोर्चात हजारो शेतकरी, शेतमजूर आपल्या न्याय मागण्यांसाठी सहभागी झाले होते.
वणी येथून २१ डिसेंबरला या मोर्चाची सुरुवात झाली. १३५ किलोमीटरचे अंतर पायी चालून शेतकरी, शेतमजूर आपल्या न्याय्य मागण्या घेऊन शासन दरबारी पोहोचले. टेकडी मार्गावर मोर्चात सहभागी शेतकऱ्यांनी जोरदार नारेबाजी करून शेतकऱ्यांना शासनाने न्याय देण्याची मागणी केली. शासनाने शेतकऱ्यांसोबत न्याय न केल्यास आगामी निवडणुकीत शासनाला धडा शिकविण्याचा निर्धार मोर्चेकऱ्यांनी यावेळी व्यक्त केला. मोर्चातील शिष्टमंडळाने महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. मंत्री महोदयांनी अधिवेशन झाल्यानंतर १५ दिवसांत मुंबईत बैठकीचे आयोजन करण्याचे आश्वासन शिष्टमंडळास दिले.
नेतृत्व : अतुलकुमार अंजान, हिरालाल परदेशी, राजन क्षीरसागर, सुभाष लांडे, तुकाराम भस्मे, नयन गायकवाड, सागर दुर्योधन
मागण्या :
-पूर व अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ५५ हजार भरपाई द्यावी
-गायरान जमिनीवरील अतिक्रमणे कायम करून मालकी हक्क द्यावा
-वनजमीन धारकांना पट्टे द्यावे, त्यासाठी वनविभागाच्या अभिप्रायाची बेकायदेशीर अट रद्द करावी
-राखीव जंगल या सदराखाली वनहक्कांची पायमल्ली बंद करावी
-वनजमिनीवरील घरांसाठीचे अतिक्रमण रीतसर करून मालकी द्यावी
-रानटी पशूंच्या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या ५० मृत्यूंच्या पार्श्वभूमीवर ताडोबा अभयारण्य सफारी बंद करा
-सर्व प्रकल्पातील कालवा दुरुस्ती युद्ध पातळीवर सुरू करा
-१८ तास वीजपुरवठा करून शेती पंपाचे वीज बिल माफ करा
-घरकूल योजनेसाठी पात्र असताना मालकीची जागा नसल्यामुळे वंचित राहिलेल्यांना जागा उपलब्ध करून द्या
.................