उशिरा पावसाचा फटका : उत्पादन घटणार जीवन रामावत - नागपूर तब्बल दीड महिना रुसून बसलेल्या पावसाचा खरीप पिकांसोबतच संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनाही फटका बसला आहे. जिल्ह्यातील हजारो हेक्टरमधील ‘मृगबहार’ संकटात सापडला आहे. जाणकारांच्या मते, जून महिन्यातील मृग नक्षत्रात मान्सूनचा पहिला पाऊस पडताच शेतकऱ्यांच्या संत्राबागेला बहार येतो. मात्र यंदा संपूर्ण जून महिना कोरडा गेला. त्यात मृग नक्षत्रही कोरडे गेले. अखेर जुलैच्या शेवट वरुणराजा पावला. मात्र दीड महिना विलंबाने आलेल्या या पावसाचा खरीप पिकांना काही प्रमाणात लाभ झाला असला तरी संत्रा उत्पादनासाठी निरुपयोगी ठरला आहे. नागपूर जिल्ह्यात संत्र्याचे एकूण २५ हजार २५९ हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी १९ हजार ३५५ हेक्टर क्षेत्रातील संत्रा उत्पादनक्षम आहे. यातून गतवर्षी १ लाख २० हजार ६६० मेट्रिक टन संत्रा उत्पादन झाले होते. शिवाय गत काही वर्षांत मोसंबीची मोठ्या प्रमाणात लागवड झाली आहे. त्यानुसार सध्या जिल्ह्यात मोसंबीचे क्षेत्र ४ हजार ४५७ हेक्टरपर्यंत पोहोचले आहे. त्यापैकी ३ हजार ३८८ हेक्टर क्षेत्रातील बागा उत्पादनक्षम असून, गतवर्षी २६ हजार ७३२ मेट्रिक टन मोसंबीचे उत्पादन झाले. परंतु यंदा गतवर्षीच्या तुलनेत अर्धेही उत्पादन होणार नसल्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रत्येक शेतकरी संत्राबाग बहरण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र कृषी तज्ज्ञांच्या मते, पावसाला उशीर झाल्याने बहार फुटण्याची शक्यता मावळली आहे. विशेष म्हणजे, गतवर्षी जिल्ह्यातील संत्रा उत्पादकांना अतिवृष्टी व गारपिटीचा फटका बसला होता. अचानक आलेल्या गारपिटीने ‘अंबिया’ बहाराच्या संत्र्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे यंदा सर्व संत्रा उत्पादक शेतकरी मृगबहाराची आशा करीत होते. परंतु उशिरा आलेल्या पावसाने त्यावरही पाणी फेरले आहे.
शेतकऱ्यांचा ‘मृगबहार’ संकटात!
By admin | Published: July 27, 2014 1:22 AM