लाेकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : ‘राईस बेल्ट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रामटेक तालुक्यात मिरचीचे लागवडक्षेत्र हळूहळू वाढत आहे. तालुक्यातील काचूरवाही व मसला परिसरातील शेतकऱ्यांचा मिरचीच्या पिकाकडे झुकता कल असून, त्यांनी मिरची लागवडीची तयारीही सुरू केली आहे. त्यासाठी त्यांनी मिरचीची राेपे तयार केली आहेत. राेपे तयार करण्यापासून तर मिरची लागवड व पिकाची निगा राखण्यापर्यंतची सर्व कामे व मशागत ही तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या मार्गदर्शनात केली जात असल्याची माहिती या दाेन्ही गावांमधील मिरची उत्पादकांनी दिली.
मिरची स्थानिक व दुसऱ्या राज्यातील व्यापारी स्थानिक बाजारात माेठ्या प्रमाणात खरेदी करीत असल्याने तसेच दिवाळीपूर्वीच मिरचीपासून आर्थिक उत्पन्न यायला सुरुवात हाेत असल्याने या पिकाकडे रामटेक तालुक्यातील काही शेतकरी वळत आहे. मिरचीच्या लागवडीसाठी आधी राेपे तयार करावी लागत असल्याने काचूरवाही व मसला येथील शेतकऱ्यांनी गावालगतच्या शेतांत राेपे तयार केली आहेत. त्यासाठी त्यांनी गादीवाफे तयार केले असून, ऊन व तापमानामुळे राेपे करपू नयेत म्हणून सावलीचीही व्यवस्था केली आहे.
या मिरचीच्या राेपांची लागवड कृषी विभागाने सांगितलेल्या पद्धतीने करणार असून, वाणाची निवड, त्यांना द्यावयाची खते, खतांचे प्रमाण, त्यावरील किडी व राेगाच्या नियंत्रणासाठी करावयाची फवारणी यांसह अन्य बाबी कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली केल्या जात असल्याची माहिती काचूरवाही (ता. रामटेक) येथील रमेश नाटकर यांनी दिली असून, त्यासाठी कृषी सहायक नारायण ताेडमल यांचे वेळाेवेळी मार्गदर्शन मिळत असल्याची माहिती रमेश नाटकर यांच्यासह अन्य शेतकऱ्यांनी दिली.
...
धानाच्या तुलनेत मिरचीचा उत्पादनखर्च कमी असून, उत्पन्न अधिक मिळते. शिवाय, मिरचीचे दिवाळीपासून उत्पन्न यायला सुरुवात हाेते. मिरची हिरवी व लाल (वाळलेली) दाेन्ही पद्धतींनी विकता येत असून, साठवून ठेवण्याची समस्या नसल्याने आपण मिरचीकडे वळलाे आहे. मिरचीचे पीक या भागासाठी नवीन असले तरी कृषी विभागाचे वेळाेवेळी मार्गदर्शन मिळत असल्याने फारशा अडचणी येत नाहीत.
- रमेश नाटकर, मिरची उत्पादक
काचूरवाही, ता. रामटेक.