नागपूर : कांद्यावरील निर्यात शुल्क ४० टक्के करून कांद्याचे भाव घसरल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे. कांद्याचे भाव पडले, नाफेडमार्फत कांदा खरेदी केली जाईल, असे जपानवरून बोललेल्या माझ्या मित्राला सवाल आहे की, ४० टक्के निर्यात शुल्क माफ का केले नाही, असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला.
काँग्रेसतर्फे राज्यभर काढण्यात येणाऱ्या जनसंवाद यात्रेच्या तयारीसाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मंगळवारी रविभवन येथे पूर्व विदर्भातील प्रमुख पदाधिकाकाऱ्यांची बैठक घेतली. यानंतर पत्रकारांशी बोलताना पटोले म्हणाले,कांद्याचे दर पडल्यानंतर नाफेडमार्फत कांदा खरेदी करण्याचे राज्य सरकारने जाहीर केले होते पण प्रत्यक्षात नाफेडने कांदा खरेदी केला नाही. कांदा नाशवंत आहे, तो खराब झाला तर त्याची भरपाई सरकार देणार आहे का? शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती कमजोर करण्याचे काम भाजपा सरकार करत आहे.
शेतकऱ्यांना आतंकवादी, नक्षलवादी, आंदोलजीवी, खलिस्तानी म्हणून त्यांचा अपमान केला हे शेतकरी विसरलेले नाहीत. शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्या भाजपा व नरेंद्र मोदींकडून शेतकऱ्यांना काहीही अपेक्षा नाहीत. शेतकरी पेटून उठला तर भाजपाचा सत्तेचा माज उतरवल्याशिवाय राहणार नाही. कांद्याचा दरावरून राज्यभर तीव्र संताप व्यक्त केला जात असताना राज्यातील मंत्री मात्र लोकांच्या भावनांशी खेळत आहेत. कांदा परवडत नसेल तर महिना-दोन महिने कांदा खाल्ला नाही तर काय बिघडतं, असा उद्धट सवाल शिंदे सरकारमधील मंत्री दादा भुसे यांनी केला आहे. शिंदे सरकारमधील मंत्र्यांना ना शेतकऱ्यांची चिंता आहे ना जनतेची. हे सत्तेच्या मस्तीत आहेत पण जनता त्यांना योग्य वेळी धडा शिकवेल असा इशाराही पटोले यांनी दिला.
दोन उपमुख्यमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर नजर
- राज्यात ईडीचे आणि आता येड्याचे सरकार आहे. दोन उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर नजर लावून आहेत. यांच्यात पुढे खूप काही होणार आहे. यांच्या गम्मत जम्मतमध्ये आम्हाला पडायचे नाही. राष्ट्रवादीचा गट सत्तेत सहभागी झाल्यावर विकास कुणाचा होतोय, हे स्वतःला वाचविण्यासाठी सत्तेत गेले, असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नागपुरात महायुती सरकारला लगावला. राज्य मंत्रिमंडळात अस्वस्थता आहे. राज्याच्या जीवावर घेतलेले हे लोक आहेत. १८ कोटींचा रस्ता २५० कोटी रुपयात तयार करणारे, हे सर्व भ्रष्टचारी आहेत, अशी टीका त्यांनी केली. विधान परिषदेवरील १२ आमदारांच्या नियुक्तीबाबत ते म्हणाले, माजी राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांची बाजू मुख्यमंत्र्यांनी घेणे चुकीचे ठरेल. संविधानिक व्यवस्थेचा खून करण्याचे उदाहरण भगत सिंग कोश्यारी आहेत, असेही ते म्हणाले.