लाेकमत न्यूज नेटवर्क
कळमेश्वर : कीड व राेगाच्या बंदाेबस्तासाठी पिकांवर रासायनिक औषधांच्या फवारण्या करण्यात येतात. ही रासायनिक औषधे फवारताना शेतकऱ्याच्या जीवितास धाेका उद्भवताे. रासायनिक औषधीचे अत्यंत बारीक कण हवेबराेबर श्वासाेच्छवासासाेबत शरीरात जाणे, त्वचेच्या संपर्कातून आणि डाेळ्याद्वारे शरीरात जाणे, तंबाखू खाताना, बिडी पिताना शरीरात जाऊन धाेका निर्माण हाेऊ शकताे. त्यामुळे शेतकऱ्यांनाे, फवारणी करताना काळजी घ्या, असे आवाहन पंचायत समितीचे विस्तार अधिकारी (कृषी) दीपक जंगले यांनी केले.
कीटकनाशक फवारताना साधारणपणे गळके फवारणी यंत्र न वापरता ते दुरुस्त करून, अथवा नवीन वापरावे. कीटकनाशके फवारणी यंत्र भरताना औषधे सांडू नये, यासाठी नरसाळ्याचा वापर करावा. तणनाशक फवारणीसाठी वेगळा पंप वापरावा. संरक्षक कपडे वापरावी. फवारणीसाठी वापरलेले सर्व साहित्य पाण्याने स्वच्छ धुऊन ठेवावे. कीटकनाशकाचा वास घेणे टाळावे, फवारणी मिश्रण ढवळण्यासाठी लाकडी दांड्याचा वापर करावा, फवारणीदरम्यान तंबाखू खाणे, धूम्रपान करणे टाळावे, फवारणीच्या वापरातील भांडी नदी, नाला किंवा विहिरीजवळ धुऊ नये, धुण्यात वापरलेले पाणी पडीक जमिनीत टाकावे वा मातीत गाडावे आदींबाबत सविस्तर माहिती देत, त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
कीटकनाशकाच्या रिकाम्या बाटल्या वापरानंतर नष्ट कराव्या. फवारणीचे काम दरदिवशी आठ तासांपेक्षा जास्त वेळ करू नये, फवारणीचे काम करणाऱ्या व्यक्तीने ठरावीक कालावधीत डाॅक्टरांकडून स्वत:ची तपासणी करावी, कीटकनाशके अंगावर पडू नये, म्हणून वाऱ्याच्या दिशेने फवारणी करावी, फवारणी केलेल्या क्षेत्रात गुरांना किमान दाेन आठवडे जाऊ देऊ नये, असा सल्लाही दीपक जंगले यांनी दिला.
....
विषबाधेची लक्षणे
कीटकनाशकांचा त्वचेशी संपर्क, अथवा पाेटात गेल्यास विषबाधा हाेते. विषबाधा व इतर आजारांच्या लक्षणात बऱ्याचदा साम्य राहू शकते. अशक्तपणा, चक्कर येणे, त्वचेची जळजळ हाेणे, डाग पडणे, डाेळ्यांची जळजळ हाेणे, पाणी येणे, धूसर दिसणे, ताेंडातून लाळ गळणे, ताेंडाची आग हाेणे, उलटी येणे, पाेटात दुखणे, डाेकेदुखी, अस्वस्थ हाेणे, स्नायू दुखणे, जीभ लुळी पडणे, बेशुद्ध हाेणे, धाप लागणे, छातीत दुखणे, खाेकला येणे आदी लक्षणे आढळतात.