नागपूर : डाेरली (भिंगारे), ता. काटाेल शिवारातील पंढरी विठाेबा तिडके यांच्या शेतातील ‘नेपियर’ गवतावर विषारी ‘घाेणस’ अळी आढळून आल्याची माहिती डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकाेलाचे कीटकशास्त्रज्ञ डाॅ. प्रदीप दवणे यांनी दिली. ही अळी विषारी असल्याने शेतकऱ्यांनी तिला न घाबरता तिच्या केसांचा माणसांच्या शरीराला स्पर्श हाेणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले असून, या अळीचे प्रमाण कमी असल्याचे त्यांनी सांगितले.
पंढरी तिडके हे दुग्धव्यवसाय करीत असून, त्यांनी शेतात गुरांच्या चाऱ्यासाठी नेपियर गवताची लागवड केली आहे. त्याच गवतात ही अळी आढळून आली. तिचा प्रादुर्भाव सध्या कमी आहे. मराठवाडा व काही भागात ही अळी मक्याच्या पिकावर आढळून आली आहे. ही अळी मुख्यत: शेताच्या धुऱ्यावरील गवत, एरंडीचे पीक, आंब्याचे झाड व इतर पिकांवर आढळून येत असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी सुरेश कन्नाके यांनी दिली.
या अळीच्या व्यवस्थापनासाठी शेतकऱ्यांनी क्लाेराेपायरीफाॅस २५ मिलि किंवा प्राेफेनाेफाॅस २० मिलि किंवा क्विनाॅलफाॅस २५ मिलि किंवा इमामेक्टीन बेन्झाेएट ४ ते ५ ग्राम १० लिटर पाण्यात मिसळून किंवा निमअर्क पाच टक्के याची फवारणी करावी. फवारणी केलेले गवत किंवा पिके किंवा त्याचे अवशेष फवारणीपासून सात दिवसांपर्यंत गुरांना खाऊ घालू अथवा देऊ नका, असे अवाहन कीटकशास्त्रज्ञ डाॅ. प्रदीप दवणे यांनी केले.
...