नागपूर : जूनच्या १६ तारखेला मान्सूनने नागपूरसह विदर्भात धडक दिली हाेती. मात्र, तेव्हापासून केवळ दाेन - तीन दिवसच दमदार पावसाने हजेरी लावली आणि इतर दिवस काेरडेच जात आहेत. त्यामुळे नागपुरात २६ जूनपर्यंत सरासरी २५ टक्के, तर विदर्भात सरासरी ३७ टक्के कमी पावसाची नाेंद झाली आहे. महिन्याच्या उरलेल्या दिवसात पाऊस आला नाही तर पावसाचा बॅकलाॅग वाढण्याची शक्यता असून, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार २६ जूनपर्यंत १०३.५ मिमी पावसाची नाेंद झाली आहे. नागपुरात जून महिन्यात साधारणत: १६९ मिमी पाऊस हाेताे. दुसरीकडे विदर्भातही आतापर्यंत सरासरी ८९ मिमी. पावसाची नाेंद झाली, जी ३७ टक्के कमी आहे. या महिन्यात विदर्भात सरासरी १४१.६ मिमी. पावसाची नाेंद केली जाते. पावसाळी ढग देशातील जवळपास ६० टक्के भागात सक्रिय झाले आहेत. मात्र, १६ ते २६ जूनपर्यंतच्या काळात पावसाळी ढग कमजाेर पडले आहेत.
नागपूरसह विदर्भात कमी दाबाचे क्षेत्र तयार हाेत नसल्याने दमदार पाऊस झाला नाही. दरम्यान, छत्तीसगड, राजस्थान, गुजरात, झारखंड आदी राज्यात सायक्लाेनिक सर्क्युलेशन तयार झाले आहे. बंगालच्या उपसागरात सायक्लाेनिक सर्क्युलेशनसह कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले, तर विदर्भात चांगल्या पावसाची शक्यता निर्माण हाेईल. विदर्भात सर्वाधिक २४ मिमी. ब्रम्हपुरीमध्ये पाऊस झाला. त्यानंतर वर्धा १० मिमी, बुलडाणा २ मिमी., गाेंदिया १.२ मिमी. व गडचिराेलीत १ मिमी. असा नाममात्र पाऊस झाला. इतर जिल्ह्यात ढग शांत हाेते.
दरम्यान, रविवारी काही वेळ आकाश निरभ्र हाेते व सूर्याचे दर्शन झाले. मात्र, अधिक वेळ ढगाळ वातावरण असल्याने पारा काही अंशी घटला. नागपूरला १.४ अंशाच्या घसरणीसह ३२ अंश तापमान नाेंदविण्यात आले. आर्द्रता सकाळी ८३ टक्क्यावरून सायंकाळी ६६ टक्क्यांवर पाेहोचली. विदर्भातील इतर जिल्ह्यात तापमान ३० ते ३४ अंशांच्या दरम्यान हाेते.