नागपूर : इंजिनीअरिंगची पदवी पूर्ण झाली आणि तिला कॅम्पस मुलाखतीत एका कंपनीची ऑफरही मिळाली हाेती. मात्र मनातील पाेलिस खात्याचे प्रेम कमी हाेत नव्हते. का कुणास ठाऊक पण बालपणापासूनच पाेलिसाच्या वर्दीचे फार आकर्षण हाेते. तिच्या मनातील ही सुप्त इच्छा अखेर पूर्ण झाली. एमपीएससीच्या पहिल्याच प्रयत्नात यश मिळवत तिने पाेलिस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली. आता ही शेतकरीकन्या ‘प्रतिभा’ फाैजदाराच्या वर्दीत शाेभून दिसेल.
हे यश मिळविले प्रतिभा नत्थू बडवाईक या तरुणीने. ती भंडारा जिल्ह्यातील पेट्राेल पंपजवळच्या ठाणा या गावची रहिवासी आहे. प्रतिभाचे वडील शेतकरी आहेत व शेतीला पूरक म्हणून गावात इलेक्ट्रिकचे छाेटेसे दुकान चालवितात. परिस्थिती जेमतेमच आहे. दाेन लहान भाऊ वडिलांना दुकानात हातभार लावतात. प्रतिभाला मात्र शिक्षणाची आवड आणि वडिलांनी ती कमी हाेऊ दिली नाही. दहावीनंतर साकाेलीच्या शासकीय महाविद्यालयात पाॅलिटेक्निक पूर्ण केल्यानंतर अभियांत्रिकीला प्रवेश घेतला. ही पदवी पूर्ण केल्यानंतर काॅलेजला झालेल्या मुलाखतीमध्ये तिला एका कंपनीची चांगल्या पगाराची ऑफर आली. मात्र प्रतिभाने ती स्वीकारण्याऐवजी एमपीएससीची तयारी सुरू केली.
प्रतिभाने २०२० ला एमपीएससीची प्राथमिक परीक्षा दिली. त्यानंतर मात्र काेराेनाच्या कारणाने पुढची परीक्षा रखडत गेली. अखेर या वर्षी या परीक्षेची मेन्स परीक्षा झाली. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये नाशिकला शारीरिक चाचणी परीक्षा व मार्चमध्ये पुण्याला मुलाखत झाली. यात ३७३ गुण घेत प्रतिभा फाैजदार झाली. यादरम्याने प्रतिभाने रेल्वेचे ग्रुप डी व आरपीएफमध्येही यश मिळविले हाेते, हे विशेष.
नागपुरात ६ महिने प्रशिक्षण
प्रतिभाने आपल्या गावीच परीक्षेची पूर्ण तयारी केली. मात्र मैदानी प्रशिक्षणासाठी तिला नागपूर गाठावे लागले. येथे बेटियां शक्ती फाउंडेशन नागपूर संचालित ‘क्लिक टू क्लाउड वीमेन स्पोर्टिंग क्लब’मध्ये प्रवेश घेत तीन महिने मैदानी प्रशिक्षण घेतले. या प्रशिक्षणाची खूप मदत झाल्याचे प्रतिभा सांगते. विशेष म्हणजे क्लबमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या १४ प्रशिक्षणार्थींची विविध पदांवर निवड झाली आहे.