शरद मिरे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तालुक्यात तब्बल चारवेळा अतिवृष्टी झाली. त्यानंतर आलेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चुराडा केला. पाहणी, सर्वे, पंचनाम्यापुढे प्रशासनाचे घोडे सरकले नाही. शेतकरी कर्जाची परतफेड करण्याच्या विवंचनेत असताना केंद्राचे विशेष पाहणी पथक सोमवारी तालुक्यात पोहोचले. मोबाईलच्या प्रकाशात फक्त दोन शेतांची पाहणी केली. अंधारात नुकसान दिसले कसे हे त्यांचे त्यांनाच माहीत. मात्र आता पाहणी नको, मोबदला नको सातबारा कोरा करा अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे तालुक्यातील १५ हजार ५९८.९ हेक्टर मधील शेतपिकांचे नुकसान झाले. याचा २३ हजार २३५ शेतकऱ्यांना फटका बसला. त्यानंतर परतीच्या पावसाने १,०६६ हेक्टर शेतातील धान आडवे झाले. तालुक्यात धानाची लागवड २ हजार ९५४ हेक्टर, सोयाबीन १८ हजार २६३ हेक्टर, कापूस १५ हजार १३३ हेक्टर मिरची ९२६ हेक्टर, ऊस ३१.५० हेक्टर, हळद १४५.५० हेक्टर, भाजीपाला व इतर ५६४ हेक्टर अशी एकूण ३९ हजार ५८२ हेक्टर क्षेत्रात विविध पिकांची लागवड करण्यात आली होती. निसर्गाच्या चक्रव्यूहात ही पिके उभी होत असताना २ व ३ ऑगस्टच्या पावसाने तालुक्यातील ४ हजार २८८ शेतकऱ्यांच्या २ हजार ९१९.३१ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले. ६ व ७ सप्टेंबरच्या पावसात १७ हजार ८८१ शेतकऱ्यांच्या १२ हजार २४१.५९ हेक्टर मधील पिकांचे नुकसान झाले. यात सोयाबीन व मिरचीचा प्रामुख्याने समावेश होता. नुकसानीमुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला. अशात शेतकऱ्यांच्या आशा धान पिकावर होत्या. दरम्यान ऑक्टोबर महिन्यातील परतीच्या पावसाने होत्याचे नव्हते केले. उभे धान आडवे झाले. शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चुराडा झाला.सोमवारी नुकसानीची पाहणी करण्याकरिता अंधारात आलेले केंद्राचे पथक शेतात मोबाईलचा उजेड पाडून चालते झाले. त्यामुळे आता पाहणी किंवा तुटपुंज्या मदतीचे केवळ सोपस्कार पार न पाडता शेतकऱ्यांना पूर्णत: कर्जमुक्त करा त्यांचा सात बारा कोरा करा अशी मागणी सेलोटी येथील सुजित अवचट, मांगली येथील नितेश राऊत, भिवापूर येथील संजय बोराडे आदी शेतकऱ्यांनी केली आहे. महत्त्वाचे म्हणजे रात्रकालीन केंद्रीय पथकाच्या पाहणी दौऱ्याबाबत शेतकऱ्यांनी नाराजीचे सूर आळवले आहे.
‘शंभरीपार’अतिवृष्टीमंडळनिहाय पावसाच्या नोंदी बघितल्यास प्रत्येक मंडळात अनेकदा अतिवृष्टी झाली आहे. ताालुक्याच्या सरासरी नोंदीमध्ये ७ जुलै १५२.६३ मि.मी. ३ व १४ ऑगस्ट रोजी अनुक्रमे १५७.९३ मि.मी. व ७७.३५ मि.मी., १ सप्टेंबर रोजी १३५.७५ मि.मी पाऊस अशी अतिवृष्टी झाली आहे. या अतिवृष्टी व पूरपरिस्थितीने संपूर्ण तालुक्यासह विशेषत: चिखली, रोहणा, वडध, नक्षी, महालगाव, चिखलापार ही गावे बिथरल्या गेलीत.
नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करण्याकरिता केंद्रीय पथक सोमवारी आले होते. तालुक्यात १०६६ शेतकºयांचे एकूण ३९८ हेक्टरमधील धान पिकाचे नुकसान झाले. त्यासाठी हेक्टरी आठ हजार रुपयाप्रमाणे पहिल्या टप्प्यात आठ लाख रुपये प्राप्त झाले आहे. शासनाकडून प्राप्त होणाऱ्या टप्प्यानुसार गावनिहाय नुकसान भरपाईची रक्कम वितरण करण्यात येईल.- अनिरुद्ध कांबळे, तहसीलदार,भिवापूर